Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९१
खर्डा - अखेरचा विजय
 

आपण स्वारी करून पुणे जाळून टाकू आणि पेशव्यांच्या हाती भिक्षापात्र देऊ, अशी मिजास निजामाला चढली होती. त्याचा दिवाण मशीर उल्मुल्क हा तर तमाशात नाना, पेशवे यांची सोंगे आणून, त्यांची विटंबना करीत असे. या दिवाणाचे व नानाचे फार वाकडे होते. त्याला काढून टाका, असा नानाने निजामाशी आग्रह धरला होता. पण निजामाने तो मुळीच मान्य केला नाही. लढाईचा प्रसंग आला तर इंग्रज आपल्यास साह्य करतील, अशी निजामाची अपेक्षा होती. नुकताच आपला गुंटूर हा पूर्व किनाऱ्यवरचा जिल्हा, इंग्रजांनी मागताच त्याने देऊन टाकला होता; व टिपूच्या वेळी त्यांना मदतही केली होती. पण इंग्रजांनी मदत करण्यास साफ नकार दिला. दोन शत्रू परस्परांशी लढून हतबल होतील, तर त्यांना हवेच होते. शिवाय महादजीचा वारस दौलतराव याने उत्तरेकडून कवायती कंपू आणविले होते. त्यामुळे पराभव झाला तर सर्वच नाचक्की होईल, अशी भीतीही इंग्रजांस होती.

एकजूट
 मराठ्यांचे या वेळचे वैभव म्हणजे शिंदे, होळकर, भोसले, पटवर्धन असे सर्व सरदार एकत्र झाले होते. ही नानाची फार मोठी कर्तबगारी होती. त्याने परशुराम- भाऊस सेनापती नेमले हेही सर्वांनी मान्य केले. त्यामुळे ही लढाई मराठ्यांच्या इतिहासात चिरस्मरणीय झाली. मार्च १७९५ मध्ये खर्ड्यास झालेल्या लढाईत निजामाचा संपूर्ण मोड झाला आणि चौथाईची बाकी देणे, तीस लक्षांचा मुलूख तोडून देणे, मशीर उल्मुल्क याला मराठ्यांच्या स्वाधीन करणे, या सर्व अटी त्याला मान्य कराव्या लागल्या.
 खर्ड्याचा विजय म्हणजे मराठेशाहीच्या वैभवाचा कळस, असे सर्वांना वाटले. आणि येथून पुढे हे वैभव सर्व हिंदुस्थानभर पसरणार, मोठमोठे विजय मिळणार, अशा आशा मराठ्यांच्या चित्तात पालवू लागल्या. पण या वेळी दैव त्यांना हसत असले पाहिजे. कारण हा क्षण वैभवाचा कळस न ठरता अधःपाताचा प्रारंभ ठरला.
 सवाई माधवराव कर्ता होऊन पूर्वीच्या पेशव्यांप्रमाणे राज्यकारभार करू लागले असे सर्वांना वाटत होते. पण ऑक्टोबर १७९५ मध्ये त्याचा हृदयद्रावक अंत झाला. आजारी असताना वाताच्या लहरीत त्याने माडीवरून खाली उडी टाकली. या अपघातानेच त्याचा मृत्यू झाला; आणि सर्व मराठेशाही हादरून गेली. महादजी शिंदे, हरिपंत फडके हे १७९४ सालीच गेले होते. रामशास्त्री प्रभुने, अहल्यादेवी हे मराठेशाहीचे नैतिक आधार होते. तेही १७९५ साली गेले. आणि पुढल्याच वर्षी दुसरा बाजीराव पेशवेपदावर आला. त्याने काय कर्तबगारी केली हे जगजाहीर आहे. नारायणरावाचे खुनानंतर पेशवाई संपली असे प्रारंभी म्हटले आहे. पण मधल्या काळात सवाई माधवरावामुळे लोकांना थोड्या आशा वाटू लागल्या होत्या. त्या संपूर्ण नाहीशा करून पेशवाई प्रत्यक्षात नष्ट करणे, हे काम राघोबाच्या या पुत्राने केले.