हरिपंत आणि जांबगावी महादजीचे हस्तक बक्षी, यांनी फौजही सिद्ध केली होती. पण महादजी व नाना यांच्या स्वप्नातही तसे नव्हते, म्हणून ते प्रकरण शमले; गॉडर्ड याने जानेवारी १७८० च्या सुमारास गुजराथेत मोहीम सुरू केली आणि फत्तेसिंगास फोडून अहमदाबाद घेतले. त्या वेळी, वर सांगितलेल्या चौकडीच्या योजनेप्रमाणे, नानांनी शिंदे होळकरांना गुजराथेत जाण्यास सांगितले, पण दोन महिने ते जागचे हालले नाहीत. हरिपंत नानांच्या जवळ असता कामा नये, अशी महादजीची प्रमुख अट होती. पण कशी तरी दिलजमाई होऊन फेब्रुवारीत ते दोघे गुजराथेत गेले. पण तेथेही इंग्रजांच्या तोफांपुढे आपले काही चालणार नाही, हे पाहून महादजी गनिमी काव्याने लढू लागला. त्यामुळे दिरंगाई होऊ लागली. तेव्हा नानास पुन्हा संशय आला. पुढे महादजी उत्तरेत गेल्यावर तर नाना व महादजीचे अनेक वेळा अगदी पराकाष्ठेचे बिनसले होते. इतके की महादजी दक्षिणेत कवाइती कंपू घेऊन येत आहे अशी वार्ता आली, तेव्हा नानाने हरिपंताला फौज घेऊन पुण्याला बोलावून घेतले होते. इतकी दोघांची मने संशयग्रस्त होती. तरीही दोघांच्याही मनातला विवेक जागा होता. त्यामुळे मराठेशाही तगून राहिली. तोतयाचे प्रकरण, मोरोबाचे प्रकरण, तळेगावची लढाई या सर्व प्रकरणी महादजीने उत्तम कामगिरी बजावली होती. पण पुण्यास सर्व ब्राह्मणशाही आहे, तेथे आपला वरचष्मा असला पाहिजे, असे महादजीस नित्य वाटत असे. पण मराठी व्यवस्थेत ते शक्य नव्हते. शक्यता एकच होती. पेशवे घराणे बाजूला सारून, स्वतः महादजीने लष्करी बळावर, सर्वाधिकार हाती घ्यावयास हवे होते. तो स्वतः छत्रपती झाला असता तरीही डाव सावरला असता, पण त्याच्या मनातच पेशवे वंशाबद्दल अत्यंत निष्ठा होती. त्यामुळे ते शक्य नव्हते. तेव्हा त्या वेळच्या स्थितीत दोघांनी विवेक करून, कलह विकोपाला जाऊ न देता राष्ट्रकार्य केले, हेच कौतुकास्पद झाले, असे म्हटले पाहिजे.
गुजरात महादजीने गनिमी कावा करून गॉडर्डचा सर्व डाव उधळून लावला. तेथे आणखी राहून सर्व बंदोबस्त त्याने केला असता. पण इंग्रजांनी माळव्यात त्याच्याच मुलखावर स्वारी केली. तेव्हा तेथील मोहीम आटपून १७८० जूनमध्ये शिंदे, होळकर माळव्यात निघून गेले.
सालवाई
गुजराथप्रमाणेच पुण्यावर स्वारी करून, दादाला पुण्यास न्यावयाचे असे ठरवून, हाइले या सेनापतीला मुंबईकरांनी तिकडे पाठविले व मागोमाग त्याच्या मदतीला गॉडर्ड यासही पाठविले. पण फडके, पटवर्धन, कानडे यांनी या वेळी पराक्रमाची शर्थ करून इंग्रजी फौजांचा अगदी संहार केला. त्यामुळे गॉडर्डास रणातून पळून जावे लागले. तिकडे माळव्यात महादजीने कारमॅक, म्यूर या इंग्रज सेनापतींना चांगले तोंड दिले. मद्रासकडे हैदरने उच्छाद चालविला होताच. तेव्हा, हे सर्व प्रकरण अंगलट
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६११
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८३
खर्डा - अखेरचा विजय