Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६९
मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हिशेब
 

ठाणी उठवावयास सुरुवात केली. शिवाय सुजाने इंग्रजांचा तोफखाना मदतीस घेऊन रोहिलखंडावर चाल केली (एप्रिल १७७३). त्यावेळी विसाजी कृष्णावर कठीण प्रसंग आला होता. पण तो त्यातून निभावला. मध्यंतरी १७७२ च्या नोव्हेंबरात माधवराव मृत्यू पावला होता. त्यामुळे, दक्षिणेतून काही मदत होईल, ही आशा संपली होती. तेव्हा सर्व परिस्थिती ध्यानात घेता, आता उत्तरेत राहणे धोक्याचे आहे, हे मराठ्यांनी जाणले व होळकर आणि बिनीवाले उत्तरेतून परत आले.

गृहकलह
 त्यांच्यात दुही नसती तर असा प्रसंग आला नसता. किंवा पेशव्यांच्या घरात गृहकलह नसता तरी ही वेळ आली नसती. कारण मग तिकडून नव्या फौजा आल्या असत्या. पण तेथली दुही इतकी की नारायणरावाच्या खुनात तिचे पर्यवसान झाले व राघोबा इंग्रजांकडे गेला. पुढे त्यामुळेच इंग्रज मराठ्यांचे युद्ध जुंपले. त्यामुळे मराठे दक्षिणेत इतके गुंतून पडले की जवळ जवळ दहा वर्षे त्यांना उत्तरेत लक्ष देण्यास सवडच झाली नाही. त्यामुळे माळव्याच्या वर उत्तर हिंदमध्ये मराठ्यांचे एकही ठाणे शिल्लक राहिले नाही ! हे मराठ्यांचे साम्राज्य !
 माधवरावाने आपल्या असामान्य कर्तृत्वाने नवे कर्ते पुरुष निर्माण करून पानपतचे दुर्दैव नष्ट करीत आणले होते. मराठ्यांना पुन्हा पहिला उत्कर्ष, पहिले वैभव दिसू लागले होते. पण त्याच्या अकाली मृत्यूमुळे त्या आशा मावळल्या. आणि पुढे नारायणरावाच्या खुनानंतर, राघोबाने जो राष्ट्रद्रोह सुरू केला त्यामुळे, मराठ्यांना पूर्वस्थिती केव्हाच प्राप्त करून घेता आली नाही. नाना आणि महादजी हे दोन कर्ते पुरुष उदयाला आले, म्हणून पंचवीस वर्षे तरी मराठेशाही कशी तरी तगली. पुढे राघोबाच्या पुत्राने त्याचेच राष्ट्रद्रोहाचे व्रत पुढे चालवून मराठेशाही नष्ट करून टाकली !
 मनात विचार येतो की पेशवा हा काही राज्याचा खरा धनी नव्हे. खरे धनी छत्रपती. पण ते त्याच्याहीपेक्षा दुबळे, नाकर्ते होते. तरीही काय झाले ! शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड, पटवर्धन, असे मोठे मोठे सरदार होते ना ? या दोघांनाही बाजूस सारून ते कोणी मराठी राज्याचे धनी का झाले नाहीत ? पण त्यांच्याही अंगी हे सामर्थ्य नव्हते. मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हा हिशेब आहे.

साम्राज्याचे स्वरूप
 माधवराव पेशवा याच्या काळी मराठी साम्राज्याची स्थिती काय होती ते येथवर आपण पाहिले. पहिला बाजीराव पेशवा याच्या काळी साम्राज्य विस्तारास प्रारंभ झाला. तो विस्तार कसा व्हावयाचा आणि त्या साम्राज्याचे स्वरूप काय असावयाचे हे बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीहून स्वराज्याच्या व चौथाईच्या सनदा आणल्यानंतर, शाहू छत्रपतींनी व त्यांनी जी सरंजामी व्यवस्था ठरवून दिली, तिच्यावरून आधीच