Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
३२
 

विदर्भ म्हणजे आजचा वऱ्हाड प्रांत होय, हे जवळ जवळ सर्वमान्य आहे. त्याच्या विस्ताराविषयी काही मतभेद आहेत. वऱ्हाडापेक्षा विदर्भ मोठा होता असे म. म. मिराशी व कुलगुरू चिं. वि. वैद्य यांचे मत आहे. पण हा किरकोळ मतभेद आहे. विदर्भाचा प्रथम उल्लेख बृहदारण्यकोपनिषदात सापडतो ( अ. २, ब्रा. ६-३ ). आर्य प्रथम दक्षिणेत आले ते प्रथम विदर्भ आणि अपरान्त (कोकण) या प्रांतांत आले. उत्तर व दक्षिण यांमध्ये विंध्य हा दुर्लंघ्य पर्वत उभा होता. त्याच्या पश्चिमेकडून व पूर्वेकडून वाट काढणे सोपे होते. त्यांपैकी पश्चिमेकडून भृगू ऋषी अपरान्तात म्हणजे उत्तर कोकणात उतरले व पूर्वेकडून अगस्ती ऋषी विदर्भात उतरले. अगस्तीबरोबर भोज या क्षत्रीयवंशाची एक शाखाही विदर्भात आली. त्या वंशात विदर्भ नावाचा एक राजा होता. त्याने विदर्भा नगरीची स्थापना केली. कुंडिनपुर ते हेच. त्या राजाच्या नावावरूनच विदर्भ हे नाव पडले. ऐतरेय ब्राह्मणातही विदर्भाचा उल्लेख आहे ( ७. ३४. ९ ). महाभारत व रामायण यात महाराष्ट्र हे अभिधान नाही. पण विदर्भाचे निर्देश मात्र अनेक वेळा येतात. श्रीकृष्णाची पट्टराणी रुक्मिणी ही विदर्भ राजकन्या होती. याच भोजवंशात दमयन्तीचा जन्म झाला होता. अजराजाची राणी इन्दुमती ही भोजकुलातलीच होती. अगस्त्याची स्त्री लोपामुद्रा ही पण विदर्भकन्याच होती. विदर्भ हे धर्मनिष्ठ व श्रेष्ठ राष्ट्र होते असा महाभारतात त्याचा गौरव केलेला आहे. ' - राष्ट्रे धर्मोत्तरे श्रेष्ठे विदर्भेष्वभवद् द्विजः । ' ( भीष्म, २७२.३ ) पुढील काळात विदर्भाचा हा गौरव वाढतच गेला, असे दिसते. यानंतरचा प्रांत म्हणजे अश्मक हा होय. हा गोदावरीच्या भोवतालचा परिसर होय. प्रतिष्ठान-पैठण ही याची राजधानी. भीष्मपर्वात दक्षिणेच्या देशांची यादी दिली आहे तीत अश्मकराष्ट्र आहे. याच्या राजाचा अभिमन्यूने वध केला, असे द्रोणपर्वात सांगितले आहे. अशोकाच्या शिलालेखात पेतनिक म्हणून उल्लेख येतो तो पैठणचा होय असे विद्वानांचे मत आहे. म. म. काणे यांच्या मते प्राचीन काळी खानदेश, नाशिक, नगर या जिल्ह्यांचा अंतर्भाव अश्मकात होत होता. यादवकाळात यालाच सेऊण देश म्हणू लागले. यादव सरदार सेऊणचंद्र याने हे नाव दिले. सिन्नर ही त्याची राजधानी होती.
 कुंतल हा चिं. वि. वैद्य यांच्या मते कृष्णेच्या उगमाजवळचा देश. महाबळेश्वर, कऱ्हाड, मिरज, कोल्हापूर, चिकोडी, बेळगाव, मुधोळ यांचा यात समावेश होत असे. विदर्भात भोजांनी वसती केली तशी कुंतलात यादवांनी केली. प्रा. स्टेन को नौ यांच्या मते कुंतल व विदर्भ मिळून महाराष्ट्र होतो. महाभारताप्रमाणेच पुराणातही कुंतलाचा निर्देश आहे. वात्स्यायनाच्या कामसूत्रात कुंतलः सातकर्णिः | असा उल्लेख सापडतो.
 अपरान्त म्हणजे कोकण हा प्रांत प्राचीन काळापासून विदर्भाइतकाच प्रसिद्ध आहे. महाभारत, अशोकाचे लेख, त्याच्याही पूर्वीची गौतमधर्मसूत्र, बौधायनधर्मसूत्र ही धर्मसूत्रे (इ.पू. ५००) यात अपरान्ताचे उल्लेख येतात. शूर्पारक, सूपारक, अर्वाचीन सोपारा ही याची राजधानी होती. ही जशी परशुरामभूमी म्हणून प्रसिद्ध त्याचप्रमाणे