कर्तृत्व
अखिल भारताचे, हिंदुस्थानचे साम्राज्य, प्रत्यक्ष सत्ता चालविणारे साम्राज्य प्रस्थापित करण्याचे व ते चालविण्याचे कर्तृत्व मराठ्यांच्या ठायी नव्हते, असे वर मागे अनेक वेळा म्हटले आहे. त्याचा तपशिलवार अर्थ आपण नीट ध्यानात ठेविला पाहिजे. मुख्य: उणीव म्हणजे मराठ्यांच्या राज्यात एकमुखी, निर्णायक, सर्वांना जरबेत ठेवणारी, आज्ञापालन करून घेणारी, न केल्यास मृत्युदंडापर्यंत कडक शिक्षा देऊ शकेल अशी, सार्वभौम सत्ता, शिवछत्रपतींच्या नंतर केव्हाच नव्हती. त्यांच्या नंतरचे छत्रपती हे या दृष्टीने दुबळे, नाकर्ते असे होते. आणि पेशव्यांच्या जवळ ही सत्ता मुळातच नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे अभेद्य अशी एकजूट. ती मराठ्यांच्यात केव्हाही नव्हती, हे इतिहासात पावलोपावली दिसून येते. यानंतरचा गुण म्हणजे आपल्या साम्राज्याला अनुकूल आणि विरोधी अशा शक्तींचा पूर्ण अभ्यास, पूर्ण माहिती. इंग्रज, फ्रेंच या शक्ती तर मराठ्यांनी कधी जाणल्या नाहीतच, पण अबदाली, नजीबखान यांनाही त्यांनी कधी पुरे ओळखले नाही. रजपूत, शीख, जाट या शक्ती अनुकूल होत्या. पण त्यांचे वैर मराठ्यांनी संपादून ठेवले. अखिल हिंदुस्थानावर साम्राज्य चालवावयाचे म्हणजे 'हिंदू तितुका मेळवावा' असे ध्येय सतत डोळ्यांपुढे असावयास हवे. पण 'मराठा तितुका मेळवावा' हे सुद्धा मराठ्यांना शक्य झाले नाही; तर त्यापेक्षा अतिशय व्यापक असे जे संघटनतत्त्व ते कसे आचरणात आणणार ? त्यांनी हे व्यापक तत्त्व जाणले होते असेसुद्धा त्यांच्या पत्रांतून कधी दिसत नाही. कर्तृत्वाचे
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५८६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९.
मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हिशेब