Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५३
साम्राज्याचा विस्तार
 

प्रश्न निर्माण झाला. ते दिल्लीच्या भोवतालचा प्रदेश लुटून फस्त करू लागले ! इतक्यात निजामाशी लढा होणार हे जाणून नानासाहेब पेशव्याने त्यास दक्षिणेत बोलविले. गाजीउद्दीन (थोरला) यास निजामाच्या गादीवर बसवावे असा त्याचा विचार असल्याचे मागे सांगितलेच आहे. या बोलावण्याप्रमाणे शिंदे, होळकर दक्षिणेत गेले. पण जाण्यापूर्वी त्यांनी बादशहाच्या संरक्षणाचा करार पुरा करून त्यावर सह्या केल्या. या कराराअन्वये अबदाली व पठाण रोहिले यांच्यापासून मराठ्यांनी बादशहाचे रक्षण करावयाचे आणि त्याच्या बदल्यात पंजाब, सिंध व अंतर्वेद येथील चौथाई मराठ्यांनी वसूल करावी, अजमीर व आग्रा याची सुभेदारी पेशव्यांना देण्यात यावी, आणि खर्चासाठी बादशहाने ५० लाख रुपये द्यावे, असे ठरले.

बादशहा व वझीर
 असा करार करून शिंदे होळकर दक्षिणेत गेले. आणि इकडे बादशहा व वजीर सफ्दरजंग यांचा लढा सुरू झाला. कारण अबदालीशी परस्पर बादशहाने वाटाघाटी केल्या. यामुळे वजीर फार संतापला होता. त्यामुळे त्याने फौजा जमवून बादशहाशी प्रत्यक्ष लढाईच आरंभिली. आणि या बादशहाला काढून गादीवर कोणातरी शहाजाद्यास आणावयाचे असा मनसुबा रचला. यामुळे घाबरून जाऊन बादशहाने मराठ्यांनी दक्षिणेतून त्वरित दिल्लीला यावे, असा निरोप धाडला (सप्टेंबर १७५३). त्याअन्वये नानासाहेबाने रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर यांना उत्तरेत पाठविले. सखारामबापू, पेठे, कानडे, नारो शंकर, विठ्ठल शिवदेव हे सरदार होते. वाटेत जयाप्पा शिंदे, दत्ताजी शिंदे, खंडेराव होळकर हे त्यांना मिळाले. मराठ्यांची अशी मातबर फौज उत्तरेत आली. पण ती येण्यापूर्वीच बादशहा व वजीर यांचा कलह मिटून तह झाला होता. त्यामुळे मराठ्यांना काम काय असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. तेव्हा आग्रा व अजमीर हे कराराअन्वये मिळालेले सुभे ताब्यात घेण्याचे त्यांनी ठरविले. यातून सुरजमल्ल जाट आणि विजयसिंग यांशी लढाया होऊन रजपूत व जाट यांना मराठ्यांनी कायमचे वैरी करून ठेविले. हे वर मागे सांगितलेच आहे.

कर्तव्यच्युत
 ३० ऑगस्ट १७५३ ला दक्षिणेतून रघुनाथराव निघाला आणि ऑगस्ट १७५५ मध्ये पुण्यास परत आला. ही दोन वर्षे उत्तरेत राहून रघुनाथरावाने व मराठ्यांनी केले काय ? जाट व रजपूत यांशी बिघाड करण्याखेरीज त्यांनी काही केले नाही ! वजीर सफ्दरजंग याच्याशी वाकडे आले, म्हणून धाकटा गाजीउद्दीन यास बादशहाने मीरबक्षी म्हणजे सेनापती नेमले आणि वजिराची जागा इंतजमुद्दौला यास दिली. पण लवकरच गाजीउद्दीन याने सर्व कारभार हाती घेऊन बादशहावर अतिशय जुलूम चालविला. एकदा फौज घेऊन त्याने राजवाड्यास गराडाच घातला. त्या वेळी नव्या