Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४९
साम्राज्याचा विस्तार
 

सरदार प्रत्यक्ष रणांगणात आपसात लढतात, ही दृश्ये पाहून एकंदर हिंदी जनतेच्या मनावर फारच विपरीत परिणाम झाला !

तुळाजी आंग्रे
 तुळाजी आंग्रे याची कथा जास्त चमत्कारिक आहे. सर्व पश्चिम किनारा संभाळण्यासाठी आणि युरोपीय आक्रमण थोपविण्यासाठी शिवछत्रपतींनी मराठी आरमार निर्माण केले. त्यांचा हेतू कान्होजी आंग्रे याने पूर्ण सफल केला होता. इंग्रज, फेंच, पोर्तुगीज, शिद्दी यांवर त्याचा वचक असे. तो असेपर्यंत त्याने कोणाची मात्रा चालू दिली नाही. तो १७३१ साली मृत्यू पावला. त्यानंतर त्याचा मुलगा संभाजी याने काही दिवस तीच परंपरा चालविली. तोही १८४८ साली मरण पावला. तेव्हा त्याच्या मागून तुळाजी आंग्रे हा दर्यासारंग- सरखेल झाला. तोही असाच पराक्रमी व शूर असून इंग्रजांचा कट्टा वैरी होता. पण त्याबरोबर त्याने पेशव्यांशीही वैर धरले. इतकेच नव्हे, तर प्रतिनिधीचे रत्नागिरी व विशाळगड हे किल्ले त्याने बळकावले. शिवाय पोर्तुगीजांशी सख्य करून तो वाडीकर सावंताला व इतर मराठी मुलखाला अतिशय उपद्रव देऊ लागला. तेव्हा त्याचा बंदोबस्त करणे नानासाहेब पेशव्यास भाग पडले. बंडखोर सरदाराचा बंदोबस्त करणे यात विपरीत किंवा चमत्कारिक असे काही नाही. पण नानासाहेबाने इंग्रजांची मदत घेतली. त्यासाठी पश्चिम किनान्यावरची बाणकोट, हिंमतगड इ. पाच गावे इंग्रजांना कायमची द्यावी लागली. आणि पश्चिम किनाऱ्यावरचा एक प्रबळ सरदार नाहीसा झाल्यामुळे इंग्रजांना रान मोकळे झाले. शिवाय तुळाजीशी लढाया झाल्या त्या सर्व आपणच केल्या, मराठ्यांनी काहीच साह्य केले नाही, अशी इंग्रज अधिकाऱ्यांनी तक्रार सुरू करून किल्ल्यांतून सापडलेली लक्षावधी रुपयांची मालमत्ता दडपली. इंग्रज हा कसा आहे, त्याचे डाव काय आहेत, आपल्या कृत्याचे दूरवर परिणाम काय होणार आहेत, याची थोडीशी सुद्धा कल्पना मराठ्यांना किंवा नानासाहेबाला येऊ नये, याचे आश्चर्य वाटते. पण हे आश्चर्य नाहीच. इंग्रजांचे राज्य येथे स्थापन झाल्यावरही मराठे इंग्रजांना समजावून घेऊ शकले नाहीत, आणि कलियुगाच्या व रामरावणाच्या गोष्टी ते बोलत बसले.
 या संबंधात, नानासाहेबाने मराठ्यांचे सर्व आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले, असे वारंवार सांगण्यात येते, हे मात्र खरे नाही. आनंदराव धुळपाची नेमणूक करून नानाने मराठी आरमार चांगले सुसज्ज ठेविले होते. पण सर्व पश्चिम बाजू येथून पुढे कमकुवत झाली, यात मात्र शंका नाही. इंग्रज प्रबळ होण्याला ते एक निश्चित कारण झाले.
 मराठी साम्राज्याच्या दृष्टीने या तीन सरदारांच्या तीन कथा पाहण्याजोग्या आहेत. रघूजी भोसले हा या सर्वोत जास्त पराक्रमी. १७४५ पासून १७५५ पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत त्याने बंगाल, बिहार व ओरिसा येथे चौथाई बसविली होती. मोठमोठ्या मोगल सरदारांना त्याने वेळोवेळी नामोहरम केले होते. उणीव हीच भासते की मूळ