Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२९
अस्मितेचा उदय
 

नावाचा उल्लेख झाला. यापूर्वीच्या काळात या नावाचा उल्लेख शिलालेखात किंवा ग्रंथात कोठेच सापडत नाही. उल्लेख सापडतात ते 'महारठ्ठ', 'महारठी' असे सापडतात. त्यांचे महत्त्व कमी आहे असे नाही. प्राकृतातले ते उल्लेख असल्यामुळे त्यांना महत्त्व जास्तच आहे. पण आज रूढ असलेल्या महाराष्ट्र या नावाचा मागोवा घेत आपण चाललो होतो. त्यातला हा आद्य लेख म्हणून याचे महत्त्व विशेष एवढेच. येथून मागे 'महारठ्ठ' या नावाचा शोध घेत आपल्याला जावयाचे आहे. पण तत्पूर्वी पुराणातील 'महाराष्ट्र ' प्रदेशाचे उल्लेख पाहून मग तिकडे वळू. पुराणरचना साधारणपणे चौथ्या शतकाअखेरीपर्यंत पुरी झाली असे काही पंडितांचे मत आहे. पण त्यात मागून पुष्कळ भर घातली गेली, हे सर्वमान्य आहे. त्यामुळे त्यातील उल्लेख हा विश्वसनीय पुरावा मानता येत नाही; तथापि त्यातील निर्देश पाहणे हे अवश्य आहे.
 मार्कंडेय पुराणात - ' महाराष्ट्रामाहिषकाः कलिंगाश्रैव सर्वशः' असा महाराष्ट्राचा उल्लेख आहे ( अध्याय ५७, श्लोक ४६ .). याच ठिकाणी दक्षिणापथात कोणते देश येतात ते सांगताना इतर देशांबरोबर दण्डक, अश्मक, नैसिक, कुंतल, वैदर्भ यांचाही उल्लेख आहे. ५८ व्या अध्यायातही पुन्हा महाराष्ट्र, कर्नाटक असा निर्देश आलेला आहे. पुराण ग्रंथांचा प्रसिद्ध अभ्यासक पार्गिटर याने मार्कंडेय पुराणाच्या प्रस्तावनेत इ. स. ४ थे शतक असा त्याचा काळ ठरविलेला आहे. त्याच्या मते पुराणातले महाराष्ट्रजन हेच अर्वाचीन मराठे होत. मार्कंडेयाप्रमाणेच वायू व ब्रह्म या पुराणातही महाराष्ट्र हे देशनाम सापडते.
 वात्स्यायनाच्या कामसूत्रात 'महाराष्ट्रकाणाम् व ' महाराष्ट्रिक्य' असे उल्लेख आहेत. शं. रा. शेंडे यांच्या मते कामसूत्राचा काळ शालिवाहन शकाचे पहिले शतक हा होय. भरताच्या नाट्यशास्त्रातही 'द्रमिडांध्र - महाराष्ट्रा:' असा महाराष्ट्राचा उल्लेख आहे. सुशील कुमार दे यांच्या मते भरताचा काळ इ. सनाचे पहिले शतक किंवा इ. पूर्व दुसरे शतक होय. पण या दोन्ही ग्रंथांच्या काळाबद्दल फारच मतभेद आहेत.

महाराष्ट्र - महारठ्ठ
 'महारठ्ठ' हे महाराष्ट्र याचेच प्राकृतरूप आहे असे प्राकृत व्याकरणकारांचे निश्चित मत आहे. हा ' महारठ्ठ' शब्द सुमारे सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या पाली भाषेतील ' महावंस' या ग्रंथात येतो. मोगली पुत्ततिस्स याने इ. पू. तिसऱ्या शतकात बौद्धांची परिषद भरविली होती. त्या वेळी त्याने आपले बुद्ध धर्मोपदेशक महिसमंडल, वनवासी, अपरांतक, महारठ्ठ इ. प्रांतांत पाठविले होते असे महावंशात सांगितले आहे. असाच उल्लेख बुद्धघोषाच्या समंतपासादिकेच्या प्रस्तावनेत आहे. 'योनकधम्म रख्खितथेरं अपरान्तकं, महाधम्मरख्खितथेरं महारठ्ठं पेसेसी ।' असे तो म्हणतो. ( विनयपिटक - खंड ३ रा, सं. ओल्डेनबर्ग. या ग्रंथालाच बुद्धघोषाची ही प्रस्तावना