कर्नाटक मोहिमा
वर सांगितलेच आहे की निजाम हा मराठ्यांचा सर्वांत मोठा शत्रू होता. स्वतःच्या हैदराबाद सुभ्यात तर त्याने सुखाने कधी वसूल होऊ दिला नाहीच, पण कोणत्याच सुभ्यात असा वसूल होऊ द्यावयाचा नाही, असा त्याचा निर्धार होता. त्यामुळे कर्नाटकात तर त्याने अडसर उभे केलेच. गुजराथ, माळवा, बुंदेलखंड या प्रदेशांतही तो मराठ्यांच्या विरुद्ध कारस्थाने रचीत असे. कर्नाटकात मराठे जातात असे पाहाताच, त्याने तेथील सर्व मुस्लिम सरदार- नबाबांना पत्रे लिहून चिथावणी दिली व स्वतःही लष्कर घेऊन तेथे उतरला. यामुळे या संग्रामाला साहजिकच हिंदू विरुद्ध मुसलमान असे रूप आले. कर्नाटकात तंजावरला व्यंकोजीच्या वंशजांचे राज्य आधीपासूनच होते. संताजी घोरपडे याचे पुत्र पिराजी व मुरारराव घोरपडे यांनी गुत्तीला मराठ्यांचे बळकट ठाणे निर्माण केले होते. शिवाय श्रीरंगपट्टणचा वोडियार, साेंध्याचा राजा बस्वलिंग यांनीही मुसलमानी उपद्रवापासून आम्हांस सोडवावे अशी छत्रपतींची विनवणी केली होती. हे सर्व ध्यानी घेऊनच शाहू महाराजांनी फत्तेसिंग भोसले, दाभाडे, निंबाळकर, प्रतिनिधी यांना तिकडे पाठविण्याचा विचार केला होता. निरनिराळ्या सरदारांना निरनिराळे प्रदेश वाटून देऊन त्यांच्या कर्तृत्वास अवसर द्यावा असा त्यांचा यात हेतू होता. पण दुर्दैवाने त्यांनी कच खाल्ली. आणि पेशवा बाजीराव यालाही तिकडे जावे लागले. लागोपाठ चित्रदुर्ग व श्रीरंगपट्टण या दोन स्वाऱ्या करून त्याने त्या प्रांतांत मराठ्यांची पत पुष्कळच वाढवली. मुस्लिम अधिसत्ता सोडून कर्नाटकीय संस्थानिक मराठ्यांच्या अधिसत्तेखाली येण्यास खुषीने तयार झाले, यातच पेशव्यांचे यश सामावलेले आहे.
निजाम- शाहू
पण पेशवा बाजीराव आणि इतर मराठे सरदार कर्नाटकाच्या मोहिमेत गुंतलेले पाहून निजामाने इकडे भलताच उपद्व्याप सुरू केला. कोल्हापूरच्या संभाजीराजांना त्याने चिथावले आणि चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, रंभाजी व जानोजी निंबाळकर यांना शाहूमहाराजांच्या विरुद्ध उठवून त्यांच्या राज्यावर चहूबाजूंनी चढाईच सुरू केली. मात्र शाहूराजांना त्याने मानभावीपणाने पत्र लिहिले की तुमचा आमचा तंटा नाही. पण तुमचा पेशवा बाजीराव हा कारण नसता आमच्या मुलखाला त्रास देतो. तेव्हा त्याला दूर करा. मग तुमचा आमचा स्नेह कायमचा आहे. शाहूमहाराजांना प्रथम हे खरं वाटे. बाजीराव नसते उद्योग करीत आहे, असा त्यांचा समज झाला. पण निजामाने प्रत्यक्ष चढाईच सुरू केली, तेव्हा त्यांचे डोळे उघडले. शिवाय निजामाने त्यांना असेही लिहिले की संभाजीराजेही तुमच्याप्रमाणेच मराठी राज्यावर हक्क सांगत आहेत. तेव्हा तुम्ही आपसात लढून काय तो निकाल लावा म्हणजे
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२७
स्वराज्याचे साम्राज्य