Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२३
स्वराज्याचे साम्राज्य
 

उपद्रव देणार नाही, उलट तुमचे नेहमी संरक्षण करू.' चौथाईची पद्धत ती हीच. स्वराज्याच्या विस्तारासाठी सैन्य ठेवावे लागते, त्याला भारी खर्च येतो. तो खर्च परस्पर शत्रूच्या मुलखातून भागवावयाचा आणि त्या निमित्ताने शिरकाव करून मग तेथे पूर्ण सत्ता स्थापावयाची अशी ही स्वराज्याच्या विस्ताराची अभिनव योजना होती. साम्राज्याच्या विस्तारासाठी मराठ्यांनी याच चौथाईच्या पद्धतीचा अवलंब केला. पुढे इंग्रजांचा पराक्रमी गव्हर्नर वेलस्ली याने तैनाती फौजेचे जे तत्त्व प्रस्थापित केले. ते म्हणजे चौथाईचेच निराळे रूप होते, असे इतिहास पंडित सांगतात.

विस्ताराची सनद
 मोगल बादशहाने, दक्षिणेतले मोगली सत्ता असलेले बऱ्हाणपूर, वऱ्हाड, विजापूर, कर्नाटक, बेदर आणि हैदराबाद हे जे सहा सुभे, त्यांतून चौथाई व सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्याची सनद मरठ्यांना दिली. तीमुळे साम्राज्यविस्तार करण्यास मराठयांना फार मोठी संधी मिळाली. हा सर्व वसूल मराठ्यांनी स्वतः करावयाचा होता आणि त्याच्या बदल्यात तेथे सतत फौज ठेवून त्या मुलखाचा बंदोबस्त राखावयाचा होता. याचा अर्थ असा की ही सनद म्हणजे राज्यविस्ताराचीच सनद होती. हे जाणून मराठ्यांनी या सहा सुभ्यांत तर संचार सुरू केलाच. पण त्या मर्यादा ओलांडून माळवा, गुजराथ, बुंदेलखंड, या प्रदेशांत फौजा नेल्या आणि प्रथम जबरदस्तीने तेथून चौथाई वसूल करण्यास प्रारंभ केला आणि मागाहून तशा सनदा बादशहाकडून मिळविल्या आणि हेच धोरण पुढे रेटून बंगाल, बिहार, पंजाब, राजस्थान या प्रदेशांतही आपली सत्ता प्रस्थापित केली. अशा रीतीने चौथाई- सरदेशमुखीच्या पद्धतीने मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाला. यांतील माळवा, गुजराथ, बुंदेलखंड येथील बडोदे, उज्जयिनी, इंदूर, ग्वाल्हेर, धम, देवास, सागर अशा काही ठिकाणी पुढे पूर्ण सत्ता स्थापण्यात मरठ्यांना यश आले. पण अन्यत्र तसे यश आले नाही. त्यामुळे मराठयांच्या येथील पराक्रमाला लोकांच्या दृष्टीने हीन रूप प्राप्त झाले. पण तो पुढचा इतिहास आहे. पेशवा बाजीराव यांच्या कारकीर्दीत साम्राज्य विस्तारले कसे ते सध्या आपण पाहत आहो.

हिंदू विरुद्ध मुस्लिम
 बादशाही सनदा मिळाल्या, म्हणून दक्षिणच्या सहा सुभ्यांतील चौथाईची वसुली आणि इतर कारभार सुखाने, सुरळीत होऊ लागला, असे मुळीच नाही. मोगल बादशहा या वेळी स्वतः दुबळा असला तरी त्याचे सुभेदार व सरदार हे मराठ्यांचे अगदी हाडवैरी होते. मोगली सुभ्यांतीलच काय, पण स्वराज्यातलासुद्धा मराठ्यांचा कारभार सुखाने होऊ द्यावयाचा नाही, असा त्यांचा निश्चय होता. या सर्वांत निजाम उल्मुल्क हा मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रू हा महा धूर्त, कारस्थानी व पाताळयंत्री