राजांना एक उत्तेजनपर निरोप पाठविला. त्यामुळे ताराबाईंनी त्याला बेड्या घातल्या. पुढे साताऱ्यावर परशुरामपंत कैदेत पडला, तेव्हा त्याला मुक्त करून ताराबाईंनी पुन्हा अधिकार दिले. नंतर कोल्हापूर- संभाजीने ताराबाईला कैद केल्यावर अमात्यांनी त्याचा पुरस्कार केला असला पाहिजे. कारण त्याचे आज्ञापत्र त्याला उद्देशून लिहिले आहे. ताराबाईंना प्रारंभापासून ठाम विरोध करण्याचे धैर्य रामचंद्रपंताने दाखविले असते, तर त्याचे कर्तृत्व वाया गेले नसते व मराठी राज्याची हानी झाली नसती.
शंकराजी नारायण याने अमात्याप्रमाणेच शपथ घेतली होती. त्याला शाहू राजाचे पत्र गेले की भेटीस येतो. तेव्हा त्याचे मन अगदी द्विधा झाले व त्याने आत्महत्या केली. परशुरामपंत प्रतिनिधी याने प्रथम ताराबाईंशी खंबीर निष्ठा ठेवली. पण शाहूराजांनी कैदेत टाकल्यावर त्याने पक्ष बदलला. शाहू छत्रपतींनी त्यास प्रतिनिधिपदही दिले. पण पुढे तो पुन्हा ताराबाईंना मिळाला. आणि पुन्हा कैद केल्यावर पुन्हा शाहुराजांचा सेवक झाला. मराठी स्वराज्यावर या तीनही पुरुषांची निष्ठा होती. स्वार्थ त्यांना सुटला नव्हता हे खरे, पण फितुरीचा विचार त्यांच्या मनात आला नाही. पण ठाम निश्चय नाही, धरसोड, अविवेक यांमुळे त्यांचे कर्तृत्व वाया गेले.
एकमेव आधार
पण वर निर्देशिलेले जाधव- निंबाळकरादी जे सरदार त्यांचे कर्तृत्व, उच्च ध्येय, स्वराज्यनिष्ठा, स्वामिनिष्ठा यांच्या अभावी स्वराज्याला घातकच ठरले. शिवाय याच सुमाराला सेनापती धनाजी जाधव, परसोजी भोसले हे शाहुपक्षाचे कर्ते पुरुष, आणि मोगल दरबारात राहून शाहूराजांचे कार्य साधणारा, मोगल मनसबदार रायभानजी भोसले हे मृत्यू पावले. अशा या काळात शाहुछत्रपतींशी व स्वराज्याशी एकनिष्ठ राहून, सर्व आपत्तींना तोंड देऊन, त्यांवर मात करून, छत्रपतींना स्थिरपद करणारा एकमेव पुरुष म्हणजे बाळाजी विश्वनाथ. त्याने हे कार्य कसे केले ते आता पाहावयाचे आहे.
सामर्थ्य कशात ?
बाळाजी हा सेनापती नव्हता, रणनिपुण नव्हता. त्याचे सर्व सामर्थ्य मुत्सद्देगिरी, समयज्ञता, वाक्चातुर्य, युक्तिवाद यांत होते. मोठमोठ्या सरदारांना, सावकारांना आपल्या पक्षाला वळविणे, शत्रूचे बलाबल व मर्मस्थान जाणणे, शत्रूमित्रभाव योग्य रीतीने जोपासणे, अखंड सावध राहून योग्य वेळी पाऊल टाकणे आणि अत्यंत चतुराईने मोहरी व प्यादी हालवून शत्रूवर मात करणे यांत तो निपुण होता. या बळावरच तो यशस्वी झाला. अर्थात हे यश त्याला सुखासुखी मिळाले नाही. त्या धडपडीत त्याच्यावर अनेक कठीण प्रसंगही आले. त्याचे अनेक डाव अयशस्वी झाले, अंगावर उलटले. पण या सर्वातून त्याने जिद्दीने, धैर्याने मार्ग काढला व अखेर जिंकली.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५१०