Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०७
पेशवाईचा उदय
 



शाहू छत्रपती
 पण ताराबाईंनी तो न मानल्यामुळे शाहूराजांना प्रत्यक्ष रणांगणात उतरून या वादाचा निकाल लावावा लागला. पहिली लढाई भीमेच्या काठी खेड येथे झाली. ताराबाईचे सैन्य चालून आले, थोडी चकमक झाली. पण तेवढ्यात सेतापती धनाजी जाधव यांनी राजांना पाहून, घोड्यावरून उतरून त्यांना मुजरा केला व आपल्या लोकांनिशी ते राजांना जाऊन मिळाले. लढाई पूर्वीच खंडो बल्लाळ, नारोराम आणि बाळाजी विश्वनाथ यांनी भेद करून ताराबाईच्या अनेक सरदारांना वळवून घेतले होते. परशुराम त्रिंबक हा मात्र ताराबाईशी एकनिष्ठ होता. तो पळून साताऱ्यावर गेला व ती राजधानी लढविण्याचा विचार त्याने केला. पण लवकरच किल्ल्याला वेढा घालून शाहूराजांनी मोठ्या तडफेने तो घेतला. आणि १२ जानेवारी १७०८ रोजी स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. लगेच त्यांनी अष्टप्रधानांच्या नेमणुकाही केल्या आणि क्षत्रियकुलावतंस श्री शाहू छत्रपती यांची कारकीर्द सुरू झाली.

अंकित राज्य
 शाहूराजे यांनी शिवछत्रपतींच्या सारखीच पदवी धारण केली तरी ते शिवछत्रपतींच्या सारखे स्वतंत्र राजे झाले नाहीत. ते दक्षिणेत आले ते बादशाही मनसबदार म्हणून, एक अंकित म्हणून. आणि चौथाई सरदेशमुखीबरोबरच त्यांनी स्वराज्याच्याही सनदा बादशहाकडूनच घेतल्या होत्या. राज्याभिषेकसमयी त्यांच्या हाती त्या आल्या नव्हत्या, तरी बादशहाने जे तोंडी आश्वासन दिले होते त्याच्या आधारावरच ते राज्य करीत होते. १७०९ साली मोगल बादशहा बहादूरशहा (मूळचा शहा आलम) दक्षिणेत आला असताना शाहू छत्रपतींनी सरदेशमुखीच्या सनदांसाठी फिरून अर्ज केला. पण त्याच वेळी ताराबाईनींही आपला वकील धाडून तसाच अर्ज केला. तेव्हा तुम्ही आपसात लढून तंटा मिटवा, मग सनदा देऊ, असा बादशहाने निर्णय दिला. या वेळीही चौथाईच्या व स्वराज्याच्या सनदा बादशहाने दिल्या नाहीतच. त्या पुढे १७१९ साली बाळाजी विश्वनाथाने दिल्लीहून आणल्या. याचा अर्थ असा होतो की औरंगजेबाने मराठ्यांचे राज्य जिंकले ते त्यांनी लढून परत मिळविले नाही, तर बादशाही सनदेने त्यांना ते परत मिळाले; आणि शाहू छत्रपती प्रारंभापासूनच तसे मानून त्या आधारावरच स्वराज्यावर आपला हक्क सांगत होते.

सनदांचा आधार
 शाहूछत्रपतींचे हे सांगणे केवळ कागदोपत्री नव्हते. तसे करण्यावाचून त्यांना गत्यंतरच नव्हते. बादशहा दिल्लीला परत गेला तरी त्याचे दाऊदखान, निजाम असे सुभेदार दक्षिणेतच होते. त्याचे सरदारही अनेक ठाण्यांवर आपल्या जागा धरून