मजकुराच्या परिच्छेदाला 'यांची पेटते विडी' असा मथळा दिला आहे. (इतिहासाच मागोवा, पृ. ५१)
अंदाधुंदी
बहुसंख्य वतनदारांची ही निष्ठाहीन स्वत्वशून्य वृत्ती पाहताच, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण आणि स्वतः छत्रपती राजाराम यांनी वतनाविषयीचे शिवछत्रपतींचे धोरण नाइलाजाने सोडून दिले. कारण या पेटत्या विडीने सर्व स्वराज्याचीच राख होण्याची वेळ येऊन ठेपली होती. म्हणून, जो पराक्रम करील त्याला वतन मिळेल, असे त्यांनी जाहीर करून टाकले. मराठ्यांनी पुढे जो पराक्रम केला त्याच्यामागे ही प्रमुख प्रेरणा होती. शिवाजी महाराजांनी ज्यांची वतने खालसा केली होती त्यांना ती रामचंद्रपंताने परत दिली आणि 'जो कोणी वतनदार एकनिष्ठा धरून गडकोट हस्तगत करून देईल, या राजाचे ठायी दृढनिष्ठा धरील आणि स्वामीकार्य करून देईल, त्यास इसाफती व वतनभाग चालला असेल तेणे प्रमाणे दुमाला करून लिहोन पाटविणे' असे धोरण ठेविले. यवोदरप्रमाण भूमीसुद्धा कोणाला वतन म्हणून देऊ नये, असे 'आज्ञापत्रा'त रामचंद्रपंताने लिहिले आहे. पण परिस्थितीपुढे त्यास वाकावे लागले. मराठ्यांच्या पराक्रमास उत्तेजन देण्यास तोच एक मार्ग होता. मोगल मुलखातील जो परगणा जो मराठा गडी जिंकील तो त्याला इनाम मिळेल, असे जाहीर झाल्यामुळे शेकडो, हजारो मराठे हातात तलवार घेऊन, घोड्यावर मांड टाकून, धावू लागले. असे करून, त्यांनी मोगलांना धुळीस मिळविले, हे खरे. पण स्वराज्यनिष्ठा ही त्यामागची प्रेरणा नसून वतनलोभ ही असल्यामुळे, प्रचंड गोंधळ उडाला आणि मराठी राज्यातली शिस्त, व्यवस्था कायमची नष्ट झाली.
शिस्त संपली
थोडी कोठे धनलाभाची अशा दिसू लागली तर लोक किती अनन्वित कृत्ये करतात, फसवणुकी, लबाड्या आणि अत्याचार करतात हे सर्वांना माहीतच आहे. येथे तर वंशपरंपरा मिळणाऱ्या वतनाचा प्रश्न होता. आणि कडक असे शासन कोठेच नव्हते. प्रत्यक्ष कारभार विशाळगडावरून रामचंद्रपंताने करावयाचा आणि वतने जागिरी, पदव्या यांच्या सनदा, फर्माने राजाराम महाराजांनी जिंजीहून द्यावयाची. त्यामुळे सर्वत्र अंदाधुंदी माजली. सरदेसाई लिहितात, कोणाची कोणास दाद राहिली नाही. पाहिजे त्याने उठावे, घटकेत बादशहाकडे जावे, घटकेत रामचंद्रपंत, शंकराजी नारायण यांच्याकडे, तर घटकेत जिंजीला ! खरे बोलावे, खोटे बोलावे, अडचण दाखवून कागद करून घ्यावे, स्वार्थ साधताना कोणतेही अपकृत्य करण्यास कचरू नये, असा अव्यवस्थित कारभाराचा मामला दहावीस वर्षे सारखा चालला. त्यामुळे जी शिस्त मराठी राष्ट्रात शिवाजीने निर्माण केली ती या अंदाधुंदीच्या काळात पार नाहीशी झाली.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४९३
प्रेरणांची मीमांसा