Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४७८
 

नसे. आता प्रत्यक्ष आज्ञेने नव्हे, पण अप्रत्यक्षपणे ते घडू लागले. त्यामुळे खजिन्यात पैसा जमा होईनासा झाला आणि पेचप्रसंग वाढू लागले. शेती खालावली, व्यापार मंदावला, लूट जमा होईनाशी झाली. त्यामुळे सर्व अर्थव्यवस्थाच कोसळून पडण्याची वेळ आली. अशा स्थितीत युद्धप्रयत्न ढिले पडले तर त्यात नवल कसले ?

नवे चैतन्य
 फितुरीमुळे, आर्थिक विपन्नतेमुळे आणि शिस्त लोपल्यामुळे मराठ्यांचा प्रतिकार याच वेळी थंडावून औरंगजेबाचे मनोरथ पूर्ण झाले असते. पण संभाजी महाराजांनी मृत्यूसमयी जे अग्निदिव्य केले त्यामुळे गात्रे ढिली पडत चाललेल्या या देहात पुन्हा चैतन्याचा संचार झाला. 'तुझे सर्व किल्ले व खजिना आमच्या ताब्यात दे, आणि जे मोगल अधिकारी तुला फितूर झाले असतील त्यांची नावे सांग,' असे बादशहाने महाराजांना फर्माविले. पण त्यांनी या मागण्या फेटाळून लावल्या आणि अत्यंत उर्मट असा जवाब दिला. 'तू मुसलमान हो', अशी तिसरी अट बादशहाने घातली होती. त्यावर, 'तुझी बेटी आम्हाला देशील तर आम्ही मुसलमान होऊ,' असा अत्यंत जहाल व मानहानिकारक जबाब छत्रपतींनी दिला. (अलीकडे हे सर्व निराधार आहे, असे संशोधक म्हणतात) यामुळे बादशाचा तोल सुटला आणि त्याने अत्यंत क्रूरपणे महाराजांचा वध केला.
 या वेळी संभाजी महाराजांनी कच खाल्ली असती, माफी मागून दयेची भीक मागितली असती, लाचारी दाखविली असती तर मराठे बहुधा येथेच संपले असते. पण तसे घडले नाही. शिवछत्रपतींचे तेज या शेवटच्या क्षणी त्यांच्या पुत्राने दाखविले धीरोदात्तपणे त्यांनी मृत्यू पत्करला. आणि जिवंतपणी जे राष्ट्रतेज ते निर्मू शकले नाहीत ते मृत्यूच्या दिव्यक्षणी त्यांनी मराठयांना दिले. सर्व महाराष्ट्र पुन्हा चैतन्याने रसरसू लागला. रामचंद्रपंत आमात्य, शंकराजी नारायण, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, परशुराम त्रिंबक आणि खंडोजी बल्लाळ असे सहा थोर कार्यकर्ते, नेते उदयास आले. हे सर्व शिवछत्रपतींच्या सहवासातच वाढले होते. तेव्हा त्यांच्या प्रेरणेचा स्फुल्लिंग तोच होता. पण मधल्या अवधीत तो विकसित होत नव्हता, मलिन झाला होता. संभाजीमहाराजांच्या त्या असीम धर्मनिष्ठेमुळे तो पुन्हा उजळला आणि त्याने स्वातंत्र्ययुद्धात विजय मिळविण्याची महनीय कामगिरी केली.

भ्रमनिरास
 शिवछत्रपतींच्या निधनानंतर मराठ्यांचे स्वराज्य सहज वुडविता येईल असे बादशहास वाटत होते. पण त्या वेळी त्याचा भ्रमनिरास झाला. तसाच भ्रमनिरास शंभुछत्रपतींच्या निधनानंतर पुन्हा एकदा झाला. या वेळीही आता हे राज्य बुडाले, आपले स्वप्न साकार झाले, असे त्यास वाटू लागले. पण संभाजीमहाराजांचा त्याने