Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६७
यशापयश-मीमांसा
 

संस्कृत पंडितांनीच त्यांची पुराणे करून टाकली होती, रामकृष्णांच्या लीला असे त्यांना रूप दिले होते. मराठीत ती पुराणेच आली. महाभारताच्या शांतिपर्वात राजनीती, व्यापार, शेती, ऐतिहासिक घडामोडी यांचे वास्तव दृष्टीने, कार्यकारणभावाचा बोज राखून वर्णन केलेले आहे. पण त्याचे एक अक्षरही मराठी कवींनी किंवा संतांनी मराठीत आणलेले नाही. जे घडते ते रामकृष्णांच्या लीलांमुळे घडते, मानवी प्रयत्नामुळे नव्हे, असेच सांगण्याचा त्यांचा हेतू आहे. संत चरित्रकारांनी हेच केले आहे. सर्व संतांचा समाजाने छळ केला, पण प्रत्येक वेळी परमेश्वराने चमत्कार करून त्यांना सोडविले, अशीच सर्वत्र वर्णने आहेत. मराठी मनाचे पोषण अशा पुराण-कथांवर होत होते. असे मन नेहमीच दुबळे व कर्तृत्वहीन राहते. भारतातील अनेक प्रदेश दीर्घकाळ पारतंत्र्यात राहिले, त्याचे कारण चमत्कारनिष्ठ, दुबळे, भोळेभाबडे, असे हे मनच आहे. शिवसमर्थांच्यासारखे, विद्यारण्य हरिहरबुक्कांसारखे थोर पुरुष ज्या प्रदेशात निर्माण झाले, तेथे काही काळ मानव पराक्रमी झाला. 'पुरुष प्रयत्न बलवत्तर,' असे छत्रपती म्हणाले, 'केल्याने होत आहे रे,' 'शक्तीने मिळती राज्ये,' असे समर्थांनी सांगितले आणि लिहिलेही. तेवढ्यापुरते येथे चैतन्य निर्माण झाले. पण वर सांगितलेच आहे की हे एकट्यादुकट्याचे कार्य नाही. महाराष्ट्रात वा अन्यत्र जी कीर्तन, प्रवचने चालत ती सर्व पुराणकथांची, पुराणतत्त्वज्ञानाची चालत. ज्या वेळी पश्चिम युरोपात सर्व भाषांतील प्राध्यापक, पंडित, धर्मसुधारक ग्रीकविद्येची प्रवचने, कीर्तने करीत होते त्या वेळी भारतात, महाराष्ट्रात दौपदीला वस्त्रे नेसविली, खांब फोडून देव प्रगट झाले, भिंत चालविली, देऊळ फिरविले, अशी कीर्तने होत होती. अशा कीर्तनांतून समाजप्रबोधन होत नाही. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य, इहवाद, प्रयत्नवाद यांना चालना मिळत नाही. धर्मग्रंथांचा, सनातनशास्त्रांचा कितीही विरोध असला तरी, विवेकाला दिसले ते सत्य सांगण्याचे धैर्य मानवी मनाला लाभत नाही. तशा धैर्यावाचून राष्ट्रनिष्ठा, लोकसत्ता, यांची मूलतत्त्वे समाजात रुजविणे अशक्य असते.

अपयश का ?
 शिवछत्रपतींच्या कार्याचे मागील काही प्रकरणांत जे विवेचन केले आहे त्यावरून समाजप्रबोधनाची काही तत्त्वे त्यांनी आपल्या मनाशी निश्चित केली होती हे दिसून येईल. समर्थांनीही अशीच आणखी काही तत्त्वे जाणली होती आणि त्यांचे थोडे विवेचनही केले होते. त्यामुळेच येथे प्रयत्नवाद, स्वातंत्र्यप्रेम, विजीगिषा, ऐश्वर्याकांक्षा, प्रवृत्तिधर्म, यांचा उदय होऊन लोकांत राष्ट्रकल्पनेचा प्रादुर्भाव होत होता. त्यामुळेच स्वराज्यस्थापनेचे कार्य शिवछत्रपतींना यशस्वारीत्या करता आले. पण या दोन पुरुषांना, त्यांचे कार्य पुढे चालविणारे, समर्थ वारस लाभले नाहीत; आणि आमूलाग्र समाजपरिवर्तन होण्यासाठी जे समाजप्रबोधन अवश्य होते ते घडवून आणणारे शेकडाे शास्त्रज्ञ, प्रवासी, तत्त्ववेत्ते, प्रवचनकार, वक्ते येथे झाले नाहीत. त्यामुळे