Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४६४
 


संरक्षक जकात
 महाराजांनी लढाऊ गलबताप्रमाणेच व्यापारी गलबतेही बांधली होती आणि ती मस्कत, बसरा, इराण येथपर्यंत जात असत हे मागे सांगितलेच आहे. पण यापेक्षाही विशेष म्हणजे एकुणिसाव्या शतकात जर्मनीमध्ये फ्रेडरिक लिस्ट याने जे संरक्षक जकातीचे तत्त्व सांगितले ते महाराजांनी सतराव्या शतकात प्रत्यक्षात आणले होते. संगमेश्वर, पेण, पनवेल, कल्याण, भिवंडी येथे मोठमोठी मिठागरे होती. तेथील मीठ देशावर येत असे. पण पोर्तुगीजांच्या गोवा प्रांतात होणारे मीठ स्वस्त मिळत असे. त्यामुळे पेण पनवेलकडील मिठाचा व्यापार बसण्याची वेळ आली. त्या वेळी कुडाळचा सरसुभेदार नरहरी आनंदराऊ याला पत्र लिहून महाराजांनी गोव्यातील मिठावर जबर जकात बसवावी अशी आज्ञा केली. 'संगमेश्वराहून बारदेशचे मीठ महाग पडेल ऐसा जकातीचा तह देणे' असे त्यांचे शब्द आहेत.
 या सर्वावरून व्यापार वाढवावा, त्यायोगे मराठा समाज समृद्ध व्हावा व स्वराज्याचा आर्थिक पाया भक्कम व्हावा, याची छत्रपतींना किती तळमळ होती हे दिसून येईल. पण येथल्या वैश्यवाणी समाजाने त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला नाही. आणि राजश्रीची ही शोभा जी नष्ट झाली ती झालीच. मराठी स्वराज्यातही ती परत आली नाही. पेशवे कायमचे कर्जबाजारी असत. त्या वेळी साहुकार होते. पण ते व्याजबट्टा करणारे होते. व्यापारी नव्हते. महाराष्ट्राचे हे अंग तेव्हापासून लुळे झालेले आहे; त्यात पुन्हा जीव भरलाच नाही.

जातिभेद
 येथे राष्ट्रभावना पोसली गेली नाही, लोकशाहीची तत्त्वे रुजली नाहीत, याचे दुसरे तितकेच महत्त्वाचे कारण म्हणजे जातिभेद हे होय. मराठी राज्यात व साम्राज्यात प्रत्यक्ष जातीय कलह झाले नाहीत, सर्व जातींतून सरदार सेनापती निर्माण झाले, त्यामुळे, जातिभेदामुळे स्वराज्याचे तसे काही नुकसान झाले नाही, असे काही पंडितांनी म्हटले आहे. पण हा फार मोठा गैरसमज आहे. कसा तो पाहा.

अंध बंधने
 जातिभेदामुळे भारतात व महाराष्ट्रात व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य यांचा उदयच झाला नाही. युरोपात पोपची धर्मसत्ता, राजसत्तेप्रमाणेच अगदी संघटित अशी होती. तशी पुरोहितशाही येथे नव्हती. पण जातींच्या पंचायतींची सत्ता येथे त्या पोपच्या सत्तेपेक्षा दसपट बलिष्ठ होती. पोप एका व्यक्तीला फार तर जाळून मारीत असे. पण या जातिपंचायती सर्व कुटुंब आणि गणगोत यांवर बहिष्कार घालून त्यांना जीवनातूनच उठवीत असत; आणि ही जातिबंधने केवळ रोटीबंदी आणि बेटीबंदी एवढ्या-