Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५९
यशापयश-मीमांसा
 

त्याला पकडून धर्मन्यायासनापुढे उभे केले. तेथे 'मी फक्त परमेश्वर व माझी विवेकबुद्धी यांनाच प्रमाण मानतो. तुम्ही म्हणता, शेकडो धर्माचार्यांचे मत माझ्या विरुद्ध आहे. असेल, लाखांचे असेल ! मी माझ्या विवेकाची साक्ष त्याहून मोठी मानतो' असे सांगून जॉन हसने, जिवंत जाळून मारण्याची पोपने दिलेली शिक्षा शांतपणे सोसली. पुढच्या शतकांत लूथर, कालव्हिन, क्रॅनमर, लॅटिमर यांनी अशाच धैर्याने ही चळवळ पुढे चालविली आणि जवळजवळ निम्मा पश्चिम युरोप पोपच्या अंध सत्ते- पासून मुक्त केला.

व्यक्तित्वाचे तत्त्वज्ञान
 समाजप्रबोधनाची ही चळवळ म्हणजे भौतिकविद्येची, इहवादाची, व्यक्तिस्वातंत्र्याची, बुद्धिप्रामाण्याची चळवळ होती, हे वरील वर्णनावरून ध्यानात येईल. तसे व्यक्तिस्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान सांगणारे तत्त्ववेत्तेही या वेळी युरोपला लाभले. पदुआ नगरीचा पंडित मार्सिलिओ (१२७० - १३४०) हा या पंडितांचा मेरुमणी होय. तो पोपच्या सत्तेचा अगदी हाडवैरी होता. सर्व ख्रिस्ती जगातील लोकांच्या सार्वमताने पोपची निवड व्हावी व लोकांच्या सार्वमताचे त्याच्यावर पूर्ण नियंत्रण असावे, तो कर्तव्यच्युत, भ्रष्ट झाला तर त्याला पदच्युत करण्याचा अधिकार लोकांना असावा, असे मत त्याने मांडले. आणि ऐहिक क्षेत्रात पोपला कसलाही अधिकार असू नये, असा विचारही आपल्या ग्रंथात त्याने प्रतिपादिला. इंग्लंडमधील ओखॅमचा विल्यम हा असाच दुसरा तत्त्ववेत्ता होता. पोप हा नास्तिक आणि पाखंडी आहे, असे त्याने निर्भयपणे जाहीर केले. महाकवी डांटे आणि फ्रान्समधील पियरी डुबाईस हे असेच इहवादी, व्यक्तिवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी पंडित होते. कायदा व राजसंस्था या गोष्टी परमेश्वरप्रणीत नसून परिस्थिती व गरज याप्रमाणे त्या निर्माण होतात, म्हणून त्या पूर्ण मानवकृत आहेत, असे डुबाईस सांगत असे. तो प्लेटोचा अनुयायी असून स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणेच शिक्षण मिळाले पाहिजे, असा त्याचा आग्रह असे.

ग्रीक विद्या
 पश्चिम युरोपात हे समाजप्रबोधन झाले त्याच्यामागची मूळ प्रेरणा म्हणजे ग्रीक विद्या ही होय. मार्सिलिओ, विल्यम, डुबाईस हे सर्व ॲरिस्टॉटलचे शिष्य होते. पण ग्रीक विद्येच्या अभ्यासाला खरी चालना दिली ती इटालियन कवी पेट्रार्क (१३०४-७४) याने. त्याने व त्याच्या शिष्यांनी शाळा - महाशाळातून वर्ग चालवून, व्याख्याने देऊन, ग्रंथशाळा स्थापून या प्रभावी विद्येचे संस्कार सर्व पश्चिम युरोपीय देशांत लोकमानसावर करण्याचे अखंड प्रयत्न चालविले. मॅन्युएल क्रिसो लोरास, गाझा, लॉरेंझो, जोहान मुल्लर, इ. नावे यासाठी प्रसिद्ध आहेत. पंधराव्या शतकाच्या अखेरीस उदयास आलेले प्रसिद्ध मानवतावादी पंडित इरॅसमस, कॉलेट, थॉमस मूर यांनी ग्रीक विद्याप्रसाराचे