Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४५६
 

सांगितलेच आहे. त्याच उद्देशाने त्यांनी सातवाहन, राष्ट्रकूट, यादव या महाराष्ट्रीय राजघराण्यांच्या शासनकाळातील ग्रामसंस्थेचे पुनरुज्जीवन केले. मागे एका प्रकरणात गोत, देशक या सभांचा उल्लेख केला आहे. मागील काळी गावचा बहुतेक कारभार त्यांच्यावर सोपविलेला असे. मुस्लिमांच्या काळात या सभा निर्जीव झाल्या होत्या. महाराजांनी स्वराज्यस्थापनेनंतर त्यांची पूर्वीची प्रतिष्ठा त्यांना प्राप्त करून दिली. पाटील, कुलकर्णी, बारा बलुतेदार, शेटे, महाजन यांची सभा ते गोत होय. गावातील कब्जांचा न्याय- निवाडा हे गोतच करीत असे. एखाद्या वादीला या गोताचा निवाडा मान्य झाला नाही तर दुसऱ्या गावाच्या गोतापुढे आपला खटला चालावा, अशी मागणी करण्याची त्यास मुभा होती. परगावच्या गोताला परस्थळ म्हणत. परस्थळाकडे असे खटले नेल्याची अनेक उदाहरणे मागल्या कागदपत्रांत सापडतात. गोताच्या वरची सभा म्हणजे देशक होय. देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन, गावचे पाटील यांची सभा ती देशक सभा होय. सर्वात वरचे न्यायपीठ म्हणजे अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश हे होय.

विज्ञानेश्वर
 छत्रपतींनी न्यायदानासाठी स्वतंत्र कायदे केलेले नव्हते. याज्ञवल्क्यस्मृतीवरील विज्ञानेश्वराची मिताक्षरा ही जी टीका तीच स्वराज्यात न्यायासाठी आधारभूत ग्रंथ म्हणून मानलेली होती. स. १६६३ सालचा एक न्यायनिवाडा प्रसिद्ध आहे. त्यात, प्राथमिक साक्षीपुरावे झाल्यानंतर, 'राजश्री नेताजी पासलकर यांनी महाबळेश्वरास मनुष्य पाठवून विज्ञानेश्वर आणविला आणि पंडित, विद्वंस यांच्या मुखांतरे विज्ञानेश्वरामध्ये वृत्तीच्या विशेष विवंचना ज्या होत्या त्या संपूर्ण मनास आणून हक्क निवाडा केला,' असे म्हटले आहे.

लोकसत्तेचा पाया
 या न्यायपद्धतीने सर्व लोकांना त्वरित व योग्य न्याय मिळण्याची व्यवस्था झाली आणि ग्रामीण जनतेचे जीवन पूर्वीपेक्षा जास्त सुखावह झाले. पण याहीपेक्षा विशेष म्हणजे राज्यकारभारात आपण सहभागी आहो, आपणच कारभार करीत आहो, हा भाव जनतेच्या मनात निर्माण होऊन तिचे कर्तृत्व अधिक विकसित होण्यास संधी लाभली. अष्टप्रधानमंडळाचे महत्त्व विशद करताना नानासाहेव सरदेसाई यांनी, 'काही संकुचित व विशिष्ट अर्थाने मराठ्यांचे राज्य लोकसत्तात्मक राज्य होते,' असे म्हटले आहे. 'कारण प्रत्येकाला देशसेवा करण्यास त्यात सवड होती. ज्याने त्याने स्वतःचे कल्याण करण्यास झटणे म्हणजे एकंदर राज्यात भर घालणे, असा प्रकार होता.' हेच विवेचन गोतसभा, देशकसभा यांनाही लागू पडण्यासारखे आहे. लोकांनी स्वतःचा कारभार स्वतः पाहणे याचेच नाव लोकसत्ता. या अर्थाने वरील सभा हा लोकसत्तेचा पायाच होता.