Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५३
यशापयश-मीमांसा
 

आणि पंतप्रधान, पंत अमात्य, पंतसचीव, मंत्री, सुमंत अशी संस्कृत अभिधाने प्रधानांना दिली. आणि त्याच वेळी रघुनात भट्ट उपाध्ये चंदावरकर- पंडितराव यांच्याकडून राज्यव्यवहार कोश करवून घेऊन सर्व राज्यव्यवहारच संस्कृतभाषी करून टाकला. प्राचीन परंपरेचा असा अभिमान ज्याच्या ठायी होता तो त्या परंपरेकडे दुर्लक्ष करून, प्रशासनाला प्राणभूत असलेल्या संस्थेसाठी मुस्लिमांचे अनुकरण करील, हे अगदी असंभव आहे. तेव्हा या वादाचा क्षणभर मुद्धा विचार करण्याचे कारण नाही.

लोककल्याण उद्दिष्ट
 छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली ती राज्यकारभाराच्या सुकरतेसाठी हे उघडच आहे. 'अत्यंत अल्प कार्यसुद्धा एकट्या एक माणसाला साधणे कठीण असते. मग राज्यासारखे सर्वश्रेष्ठ कार्य एकट्या माणसाला- तो कितीही थोर असला तरी कसे साधणार ?' असे शुक्रनीतीत म्हटले आहे. हे ध्यानात घेऊन महाराजांनी प्रारंभापासूनच एकेका मंत्र्याची नेमणूक करण्याचा उपक्रम केला होता. पण कारभाराची सुकरता याच एका दृष्टीने अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व होते असे नाही. त्याची स्थापना करून, महाराजांनी फार मोठे सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणले, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. सरदेसायांनी त्याचे उत्तम विवेचन केले आहे.
 राज्य हे लोकांच्या सुखासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी असते, हे प्राचीन महातत्त्व महाराजांना पुन्हा प्रस्थापित करावयाचे होते. मुसलमानी राज्यात हे उद्दिष्ट कधीच नव्हते. सरदेसाई म्हणतात, 'मुसलमानांच्या अनेक राजघराण्यांत प्रजेच्या सुखाची परवा करणारे राजघराणे फक्त मोगलांचे झाले. त्यातही अकबर व शहाजहान या दोनच कारकीर्दी नावाजलेल्या आहेत. परंतु या बादशाहीचे स्वरूप लष्करी बाण्याचे होते. म्हणजे केवळ लष्करी जोरावर देश जिंकून त्याचे संरक्षण करावयाचे, यापलीकडे राज्यव्यवस्थेची मजल फारशी गेलेली नव्हती. उलटपक्षी शिवाजीच्या राज्याची मजबुती, मोगलांप्रमाणे लष्करी जोरावर रचलेली नसून, लोकसुखवृद्धीवर स्थापिलेली होती. शिवाजीचे मूळपासून धोरणच तशा प्रकारचे होते. केवळ स्वतःच्या अभिवृद्ध्यर्थ त्याने हे काम केलेले नाही. त्याचे प्रत्येक कृत्य सार्वजनिक हिताचे होते. लोक दांडगाई करू लागले तर पुष्कळशी फौज जमवून, मोगलांप्रमाणे केवळ तलवारीच्या जोरावर त्यास दाबात ठेवणे, शिवाजीस सहन झाले नसते. तो आपल्या देशाकरिता, राष्ट्राकरिता म्हणजे राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीकरता उद्योग करीत होता. शिवाजी व मोगल बादशहा यांजमधील हा महत्त्वाचा फरक होय.' (मराठी रियासत; पूर्वार्ध, पृ. ४५५) 'मुसलमानी राज्यपद्धतीत शिवाजीच्यासारखे प्रधानमंडळ नव्हते, असेच म्हणणे भाग पडते. अशा प्रधानमंडळाची योजना केवळ प्रजेच्या कल्याणासाठीच उत्पन्न होत असते.'(पृ. ४५४)