या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५१
शिवछत्रपतींची युद्धविद्या
युद्धविद्या शिकवून, मुस्लिम सत्ता नामोहरम करून, स्वराज्याची स्थापना केली. मराठा राजा सिंहासनाधीश्वर झाला. यामुळे जे हिंदू या कलियुगात हिंदुराजा होणे नाही, मुसलमानच आता राज्य करणार, असे मानण्याइतके मरगळले होते, त्यांच्या मनापुढे इराण, रूमशाम येथपर्यंत स्वराज्यस्थापना करण्याची स्वप्ने तरळू लागली ! छत्रपतींचे अवतारकार्य ते हेच.
आता छत्रपतींच्या आयुष्याच्या पन्नास वर्षाच्या काळात महाराष्ट्रात, ज्या घडामोडी झाल्या, जी परिवर्तने झाली त्यांचे, युरोपात याच काळात जे समाजप्रबोधन चालू होते त्याच्याशी तुलना करून, थोडे मूल्यमापन पुढील लेखात करू आणि क्षत्रिय- कुलावंतस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांच्या या कार्याचे हे विवेचन संपवू.
■