Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४९
शिवछत्रपतींची युद्धविद्या
 

पतींनी खांदेरी व उंदेरी या बेटांवर तटबंदी उभारून तेथे आपले ठाणे १६७९ साली निर्माण केले. इंग्रजांचा याला सक्त विरोध होता. त्यांनी खांदेरीवर आरमारी हल्लाही केला. पण मराठा आरमाराने त्यांचा व त्यांच्या मदतीस आलेल्या सिद्दीचा निखालस पराभव केला. तेव्हा शरणागती पत्करून इंग्रजांनी छत्रपतींशी तह केला.

फलश्रुती
 अशा रीतीने जलदुर्ग बांधून आणि नौदलाची उभारणी करून महाराजांनी स्वराज्याचा पाया भक्कम केला. पोर्तुगीज, सिद्दी व इंग्रज यांना ते अजिबात नष्ट करू शकले नाहीत. पण त्यांच्यावर वचक बसवून कोकणातील हिंदूचे जीवन त्यांनी पुष्कळ सुरक्षित केले आणि कारवारपासून सुरतेपर्यंतच्या प्रदेशापैकी निम्म्यावर प्रदेश स्वराज्यात आणला. याखेरीज आणखी एक मोठा फायदा म्हणजे समुद्रपार मराठ्यांचा व्यापार सुरू झाला. बाराव्या शतकानंतर हिंदूंची राज्ये बुडाली आणि समुद्रगमन बंद झाल्यामुळे व्यापारही बुडाला. शिवछत्रपतींनी हिंदवी राज्य स्थापन केले आणि व्यापारालाही चालना दिली. इ. स. १६६४ मध्ये कोकण किनाऱ्यावरची आठनऊ बंदरे त्यांच्या ताब्यात होती. त्या प्रत्येक बंदरातून दोनतीन व्यापारी जहाजे इराण, बसरा, मक्का, मोचा, एडन या ठिकाणी माल घेऊन जात. या व्यापाराचे महत्त्व अमात्यांनी उत्तम वर्णिले आहे. आपला व्यापार चालवून, इतर देशांच्या व्यापारालाही उत्तेजन द्यावे, त्याचे संरक्षण करावे, म्हणजे त्यापासून जकातीचे विपुल उत्पन्न मिळते, असे ते म्हणतात. छत्रपतींनी त्याच धोरणाचा अवलंब करून स्वराज्याचा खजिना पुष्कळच समृद्ध केला, ही फलश्रुती लहान नाही.

सेना संघटना
 पायदळ, घोडदळ आणि नौदल अशी तीन दले छत्रपतींनी उभारली आणि त्या तीनही दलांना अत्यंत बांधीव असे रूप देऊन टाकले. पायदळात दहा शिपायांची एक तुकडी असे. तिच्या मुख्याला नाईक म्हणत. पाच नाइकांवर एक हवालदार, दोन हवालदारांवर एक जुमलेदार, दहा जुमलेदारांवर एक एकहजारी आणि पाच एकहजारींवर म्हणजे पाच हजार फौजेवर एक सरनौबत असे. अष्टप्रधान मंडळातील सेनापतीच्या हुकमतीखाली असे अनेक सरनौबत असत. घोडदळाची बांधणी साधारण अशीच असे. पंचवीस घोडेस्वारांच्या तुकडीवर हवालदार, पाच हवालदारांवर एक जुमलेदार, दहा जुमलेदारांवर एक सुभेदार व दहा सुभेदारांवर एक पंचहजारी असे चढत्या श्रेणीचे अंमलदार असत. नौदलातही अशीच श्रेणी होती. त्या दलाच्या मुख्याला दर्यासारंग म्हणत.