Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४१७
'मऱ्हाष्ट्र राज्य'
 

 जेथे घराण्यातील भाऊबंदकीची कथा अशीच आहे. खेळोजीचा नातू कान्होजी यास सात मुलगे. सर्वात धाकटा नाईकजी यास अदिलशहाने देशमुखीचे वतन दिले. त्यामुळे दोघा वडील भावांनी नाईकजीस ठार मारले. तेव्हा नाईकजीच्या लोकांनी त्या भावांना ठार मारले. मग आदिलशहाने नाईकजीची बायको अनसवा हिच्या नावाने देशमुखी करून दिली. पण तिला मुलगा झाल्यावर त्या दोघांना मारण्यासाठी नाईकजीचे दुसरे दोघे वडील भाऊ चालून आले. अनसवा मारली गेली. पण मुलाला दाईने वाचविले. हा मुलगा म्हणजेच शिवाजीला मिळालेला कान्होजी जेधे होय.
 वतनदारी हा केवढा भयानक रोग महाराष्ट्र समाजाला जडला होता ते यावरून कळून येईल. या लोकांना नीती, धर्म, आईबाप, स्त्री, बाल यांपैकी कशाचीच जाण राहिली नव्हती. फलटणच्या मुधोजी निंबाळकराला त्याच्या दोघा मुलांनीच ठार मारले. कारण त्याने त्यांच्या धाकट्या भावाला देशमुखी देण्याचा विचार केला होता. स्त्रीहत्या, पितृहत्या ही भारतीय संस्कृतीने महापातके मानली आहेत. पण वतनदार असा भेदाभेद मानीत नसत. सत्य, अहिंसा, दया हा धर्म संत तीनशे वर्षे या समाजाला शिकवीत होते. पण त्याचा कसलाही संस्कार वनतदार आपल्यावर होऊ देत नसत.
 इत्यर्थ असा की महाराष्ट्र समाज हा समाजच राहिला नव्हता. माणसामाणसांमध्ये काहीतरी नीतिनियम, काही कर्तव्यबुद्धी, काही बंधने, कोठला तरी कायदा चालत असेल तरच त्या समूहाला समाज म्हणता येईल. तशी कसलीही बंधने, कसलीही नीती या समाजात राहिली नव्हती.

पातशाही किताब
 देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी यांच्या या कथा झाल्या. यांच्या वरच्या पायरीवर असणारे जे मनसबदार, जहागीरदार, सरदार यांच्या कथा यांहून फारशा निराळ्या नाहीत. छत्रपतींच्या पूर्वी दोन-अडीचशे वर्षांच्या काळात, विशेषतः बहामनी राज्याची पाच शकले झाल्यानंतर, मोठमोठ्या अधिकारपदांवर अनेक मराठा सरदार चढले होते. कंवरसेन, अचलोजी जाधव, संभाजी चिटणीस (निजामशाही), मुरारराव जगदेवराव, रामराव, कदमराव, मादण्णा, आक्कण्णा (कुतुबशाही), मुरार जगदेव (आदिलशाही) ही नावे प्रसिद्धच आहेत. यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करून अनेक मराठ्यांना मोठ्या पदावर चढविले होते. यांतील काही इतके पराक्रमी होते की सुलतानाशी जरा बिनसताच ते बंडाळ्या माजवीत व सुलतानाला हैराण करीत. जगदेवरावाने तीनही पातशहांना त्रस्त केले होते आणि वाटेल त्यास राजपदावरून काढण्याची व स्थापण्याची त्याच्या ठायी शक्ती होती असे सरदेसायांनी म्हटले आहे. मनात प्रश्न असा येतो की यांनी ही शक्ती मराठा सरदार राज्यपदी आणण्यासाठी, स्वराज्यस्थापनेसाठी का उपयोगात आणली नाही ? जावळीचे वतन
 २७