Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०९
अर्थमूलो हि धर्मः ।
 

लादण्याचे नाकारले. दुसऱ्या एका गावच्या सभेने कुळकर्ण्याची नेमणूक आपली आपणच केली. छत्रपतींनी तिला मंजुरी दिली. पाटबंधारे बांधणे, विहिरी खोदणे, पडीत जमीन लागवडीस आणणे या कामी नाना कटकटी निरनिराळे लोक निर्माण करीत. पण या बाबतीत गोतसभेचा निर्णयच महाराज नेहमी उचलून धरीत. म्हणूनच मावळात आणि कोकणात अल्पकाळातच जमिनी फुलू लागल्या, आबादानी निर्माण झाली आणि स्वराज्याचा महसूल वाढला. फ्रेंच प्रवासी कॅरे याने कोकणातल्या अनेक खोऱ्यांत जमिनी सुपीक होऊन सुबत्ता कशी निर्माण झाली होती याचे वर्णन लिहून ठेविले आहे. छत्रपतींनी आर्थिक क्रांती घडविली तिचे स्वरूप असे आहे. शेतकऱ्याला पिळून नागवून पातशाही खजिना भरणे ही जुनी पद्धत होती. शेतकऱ्याला व रयतेला साह्य करून तिचे उत्पन्न वाढवून त्यातून स्वराज्याचा खजिना भरणे ही नवी पद्धत होय. क्रांती म्हणण्याइतकी ती निश्चितच भिन्न आहे.

वतनदारी आवश्यक
 शिवछत्रपतींनी केलेल्या आर्थिक क्रांतीचे हे स्वरूप पाहिल्यानंतर आता त्यांनी वतनदारी, सरंजामदारी, तर्फदारी नष्ट केली काय या प्रश्नाचे उत्तर देता येईल. या विषयाचे उत्कृष्ट विवेचन शं. ना. जोशी यांनी 'अर्वाचीन महाराष्ट्रेतिहासकालातील राज्यकारभाराचा अभ्यास' (भाग १ ला) या पुस्तकात केले आहे. त्यांच्या मते महाराजांनी वतनदारी मुळीच नष्ट केली नाही, इतकेच नव्हे तर तसे करणे इष्टही नव्हते. तो काळ धामधुमीचा होता. लढाई झाली नाही, लष्कराने उच्छाद मांडला नाही, मोगल, विजापूर, सिद्दी यांपैकी कोणाची स्वारी आली नाही असे एक वर्षही जात नसे. अशा स्वाऱ्या आल्या की गावचे गाव बेचिराख होत, ओसाड पडत. वसती उठून जाई. जमिनीची लागवड, मशागत वर्षावर्षात होत नसे. शेतकऱ्यांची घरेदारे आणि त्याबरोबरच बैल, नांगर, औते, बीबियाणे हा शेतीचा सरंजाम नष्ट होऊन जाई. अशा स्थितीत या गावांची आणि परगण्यांची पुन्हा वसाहत कोणी करावयाची ? हे काम गोतसभेचे व देशकाचे म्हणजे देशमुख, देशपांडे, देसाई, देशकुळकर्णी, पाटील, कुळकर्णी, शेटे, महाजन, जमीनदार यांचे होते. गावचे परागंदा झालेले समस्त लोक पुन्हा जमा करून त्यांच्या मदतीने गावाची पुन्हा वसाहत करणे व जमिनीची कसणूक पुन्हा सुरू करणे हे कार्य ही वतनदार मंडळीच करीत. कोठल्याही राजसत्तेला हे शक्य झाले नसते. कारण एवढी माणसे उभी करणे हे त्या धामधुमीच्या, अदाधुंदीच्या काळात अशक्यच होते. ज्यांचे स्वहित त्यात गुंतलेले आहे, ज्यांचे भवितव्य या वसाहतीवर, शेतीवर अवलंबून आहे, जे त्या देशचे आहेत, ज्यांचा तो देश आहे तेच लोक हे काम करणे शक्य होते.
 अराजक, अंदाधुंदी याविषयी हे झाले. पण गावावर व शेतीवर इतरही अनेक आपत्ती नेहमीच येत असतात. अवर्षण, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, रोगराई, टोळ-