Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०७
अर्थमूलो हि धर्मः ।
 

लोहगडावर हिलाल हबशी होता. हिरडस मावळात बांदल देशमुख होते. पुरंदरावर निळो नीळकंठ होता. या सर्वांना अनेक युक्या प्रयुक्या करून राजांनी पदच्युत केले आणि तो मुलूख म्हणजे बारा मावळे स्वराज्यात आणली. सभासद म्हणतो, 'राजियाने देश काबीज करून हुडे, वाडे, कोट पाडिले. नामांकित कोट जाहाला तेथे आपले ठाणे ठेविले. आणि मिरासदारांचे हाती नाहीसे केले. असे करून, मिरासदार इनाम इजारतीने मनास मानेसारखे आपण घेत होते ते सर्व अमानत करून (जप्त करून) जमीनदारास गल्ला व नख्त गाव पाहून देशमुखांस व देशकुलकर्णी यांस व पाटील कुलकर्णी यांस हक्क बांधून दिले. जमीनदारांनी वाडा बुरजांचा बांधू नये, घर बांधून राहावे. ऐसा मुलकाचा बंदोबस्त केला.'
 यानंतर पुढच्या काळात जेव्हा जेव्हा नवा मुलूख स्वराज्यात महाराज सामील करून घेत तेव्हा तेव्हा तेथे असाच बंदोवस्त करीत. रयत आणि राजसत्ता यांचा प्रत्यक्ष संबंध जोडणे, मोकासा किंवा मक्तेदारी नष्ट करून, शेतकऱ्याला अभय देऊन, त्याच्या कल्याणाची चिंता राजसत्तेने वाहणे हे नव्या अर्थव्यवस्थेचे प्रधान लक्षण होय. देशमुखी, वतनदारी, मिरासदारी, महाराजांनी समूळ नष्ट केली किंवा काय याचा विचार पुढे शेवटी करू. पण त्यांची अनियंत्रित सत्ता व तिच्यामुळे माजलेले अराजक त्यांनी नष्ट केले यात शंकाच नाही. ते नष्ट करून एकंदर व्यवस्था काय केली ते थोडक्यात पाहून पुढे जाऊ.

पुनरुज्जीवन
 महाराजांनी पहिली गोष्ट केली ती ही की त्यांनी ग्रामसंस्थेचे पुनरुज्जीवन करून तिला तिचे पूर्वीचे स्थान मिळवून दिले. वर सांगितलेच आहे की मुसलमानी अमलात या ग्रामसंस्था टिकून राहिल्या असल्या तरी त्या नावापुरत्याच होत्या. वतनदारी, तर्फदारी या पद्धतीमुळे रयत पूर्णपणे नागवली गेली होती. देशमुख, देशपांडे, देश- कुलकर्णी हे फार प्रबळ झाले होते. त्यांच्यातलेच काही पातशाही सरदार झाले होते. त्यामुळे गावपंचायतीचे त्यांच्यापुढे काही चालत नसे. शिवाय पंचायतीच्या हुकमांची अंमलबजावणी पातशाही अधिकाऱ्यांमार्फत होत नसल्यामुळे त्या हुकमांना व पंचायतीच्या कारभाराला काही अर्थ उरला नव्हता. छत्रपतींनी प्राचीन काळच्या ग्रामसंस्थांना तो अर्थ पुन्हा प्राप्त करून दिला.

कुनबियाची खबर
 गोतसभा आणि देशक अशा दोन ग्रामसंस्था त्या वेळी होत्या. गोतसभा ही एका गावापुरतीच असे. पाटील, कुळकर्णी, शेटे, महाजन, बलुतेदार, चौगुला हे सर्व मिळून गोतसभा होई. आणि एका देशमुखाच्या सत्तेखालच्या सर्व गावांचे म्हणजे देशात्य पाटील, कुळकर्णी, शेटे, महाजन, शिवाय देशमुख, देशपांडे, देस कुळकर्णी यांची