Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३९४
 

ल्याचे सार्थक. पुरुषप्रयत्न बलवत्तर, दैव पंगू आहे. यास्तव प्रयत्ने अलबल करावे, त्यास दैव जसजसे सहाय्य होईल तसतसे अधिक करीत जावे. देव परिणामास नेणार समर्थ आहे.'
 महाराजांच्या धर्मक्रांतीच्या तत्त्वज्ञानातील हा दुसरा सिद्धान्त होय. स्वराज्य आणि स्वधर्म यांचा अभेद हा पहिला आणि समाजाच्या उत्कर्षाचे काल हे कारण नसून राजा (मानव) हे कारण आहे, राजाच कृतयुग वा कलियुग निर्माण करतो हा दुसरा सिद्धनत होय.

(३) क्षत्रियकुलावतंस
दोनच वर्ण
 कलियुगात धर्म लयास जाणारच, मानवी कर्तृत्व लोपणारच, असे पुराणे सांगत होती. त्यामुळे हिंदूंचा आत्मविश्वास नष्ट झाला होता. या युगात मुस्लिमच राजा होणार, हिंदू सरदार राजपदी येऊ शकणारच नाही, असा समज रूढ झाला होता. या युगात सत्ता यवनांची, म्लेंच्छांची होणार हा विचार हिंदू लोकांनी अगतिक होऊन स्वीकारला होता. याच्या भरीला शास्त्रीपंडितांनी आणखी एक विषबिंदू त्यांच्या जीवनात कालवून ठेवला होता. 'कलावाद्यंतयोः स्थितिः ।' कलियुगात पहिला म्हणजे ब्राह्मण वर्ण आणि अंतीचा म्हणजे शुद्र वर्ण हे दोन वर्ण आहेत. क्षत्रिय आणि वैश्य हे दोन्ही वर्ण या युगात नष्ट झालेले आहेत हा तो विषबिंदू होय. विष्णु पुराण, मत्स्य- पुराण यांनी सांगून टाकले, 'नंदांतम् क्षत्रियकुलम्' - नंदवंशाबरोबरच क्षत्रियकुळे सर्व नष्ट झाली. या नंदवंशाचा महाराज चंद्रगुप्त मौर्य यांनी उच्छेद करून स्वतःचे साम्राज्य स्थापिले होते आणि पुराणांच्या मते त्याच वेळी भारतातले सर्व क्षत्रियवंश नाहीसे झाले. महाराज चंद्रगुप्तांनी साम्राज्य स्थापन केले, अखिल भारतभर त्याचा विस्तार केला. पण पुराणांच्या मते ते शूद्र होते. वास्तविक कलियुगात क्षत्रिय नाहीत, हे मत कोणत्याही स्मृतिकाराने मान्य केलेले नाही. ज्यांना पुराणांनी शूद्र ठरविले त्या मौर्य आणि सातवाहन वंशातील थोर सम्राटांनी अश्वमेध यज्ञही केले होते आणि त्या वेळच्या ब्राह्मणांनी त्यांचे पौरोहित्यही केले होते. पण पुराणलेखकांनी आपला दुराग्रह सोडला नाही आणि दुर्दैवाने सातव्या आठव्या शतकापासून पुराणमतांची पकड समाजमनावर जास्त जास्त दृढपणे बसू लागली. हिंदूंच्या अधःपाताला तेथूनच प्रारंभ झाला. पुराणानंतर स्मृतींवर भाष्य लिहिणारे जे निबंधकार त्यांनी पण 'कलावाद्यंतयोः स्थितिः ।' हाच सिद्धान्त उचलून धरला. वास्तविक या मधल्या काळात अनेक क्षत्रिय राजघराणी उदयास आली होती आणि त्यांनी महापराक्रम करून साम्राज्येही स्थापिली होती. पण परिस्थिती पाहून, इतिहास पाहून, स्वतः अवलोकन करून, धर्मतत्त्वांचा निश्चय करावा, ही प्राचीनांची परंपराच पुराणानंतर भारतातून नष्ट होत चालली आणि