राजकारणात, राष्ट्रकार्यात म्हणजेच राजकार्यात सर्वांना वोढोनि आणिले. यामुळेच महाराष्ट्रात समाजाचे सर्व थर जागे होऊन स्वराज्याभिमुख झाले. आणि त्यामुळे मराठ्यांच्या ठायी एक अद्भुत शक्ती निर्माण होऊन अखिल भारत यावनी आक्रमणापासून मुक्त करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले.
शेकडो रामदास !
समर्थांच्या कार्याच्या महत्त्वाबद्दल सध्या खूप वाद चालू आहेत. शिवछत्रपतींना हाताशी धरून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे समर्थांच्या अंध भक्तांनी लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे प्रामुख्याने हा वाद माजलेला आहे. समर्थांच्या या भक्तांना शिवछत्रपतींच्याच नव्हे, तर समर्थांच्याही कार्याचे आकलन करण्याची पात्रता नव्हती. 'या परमार्थिकांनी समर्थांचा पराभव केला,' असे प्रा. माटे यांनी लिहिले आहे, ते याच अर्थाने. लोकजागृती, लोकसंघटना, राष्ट्रधर्माचा प्रसार हे समर्थांचे जे कार्य त्याचे त्यांना आकलन झाले असते तर शिवछत्रपती हे काय तेज आहे, हा केवढा स्वयंप्रभ महापुरुष आहे, ते ईश्वराचे कसे देणे आहे, हे त्यांना कळले असते, आणि मग समर्थांना कर्ते वारस लाभून युरोपप्रमाणेच भारतात, सर्व प्रदेशांत राष्ट्रधर्माचा प्रसार झाला असता. मराठ्यांच्या यशापयशाची मीमांसा करताना, मराठा साम्राज्यात शेकडो रामदास व्हावयास हवे होते, असे राजवाडे यांनी म्हटले आहे, त्याचा भावार्थ हाच आहे. पण दुर्दैव असे की समर्थांना शेकडो काय, एकही तशा योग्यतेचा खरा वारस लाभला नाही आणि त्यामुळे राष्ट्रधर्माची तत्त्वे महाराष्ट्रात सुद्धा दृढमूल झाली नाहीत. समर्थ या भूमीत अवतरले हेच भाग्य, असे तो इतिहास पाहताना म्हणण्याची पाळी येते.
प्रथम भेट
शिवछत्रपती आणि समर्थ यांची प्रथम भेट केव्हा झाली, हाही एक वादविषय आहे. १६४९ च्या सुमारास भेट झाली असे मान्य केले तर स्वराज्याची प्रेरणा छत्रपतींना त्यांनी दिली, ते त्यांचे प्रारंभापासूनच राजकीय गुरू होते, हा पक्ष बलवत्तर होतो. म्हणून त्यांची १६७२ पर्यंत भेटच झाली नव्हती असा पक्ष मांडण्यात येतो. पण प्रा. माटे, डॉ. पेंडसे यांनी प्रतिपादिल्याप्रमाणे या दोन विभूती स्वयंप्रभ होत्या, हे मान्य केल्यानंतर, वादातला दंशच नाहीसा होतो. आणि हे प्रतिपादन आता सर्वमान्य झालेले आहे. तेव्हा या वादाचा निकाल केवळ कागदोपत्रीचा पुरावा पाहून करणे हे आता शक्य आहे. पण मला या बाबतीत अगदी निराळा विचार मांडावा असे वाटते. शिवछत्रपती अत्यंत जागरूक, अत्यंत सावध होते. महाराष्ट्रातच काय, पण दिल्लीपर्यंत कोठे काय चालले आहे, याची खडान् खडा वार्ता नित्य आणविण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. अशा परिस्थितीत महाराष्ट्रभर मठस्थापना, मंदिरस्थापना
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३७८