Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३७६
 

समासी प्रकरण लिहून सेवकधर्माचे स्वरूप स्पष्ट केले आहे.
 हा सेवक वर्ग म्हणजे पुन्हा बहुजन समाज आला. पाटील, चौगुला, कुळकर्णी, चिटणीस, फडणीस, खजिनदार, सामलेदार, सर्व प्रकारचे कारकून, पहारेकरी, टेहळे, हेजीब, कमाविसदार, तालुकदार, महालकरी, देशमुख, देशपांडे, सबनीस, कारखाननीसदार, हवालदार, जुमलेदार, सुभेदार, नालबंद, भिस्ती, बारगीर, शिलेदार, भोई, रामोशी, चौकीदार, नाकेदार, खलाशी, नावाडी, सुतार, लोहार, पाथरवट, गवंडी असा हा सेवक वर्ग बहुजनातूनच येतो, पण त्याच्यावर त्याच्या विशिष्ट कामाची जबाबदारी असल्यामुळे व राज्यकारभारात तो प्रत्यक्ष सहभागी असल्यामुळे त्याला त्याचा स्वधर्म समर्थांनी समजावून दिला आहे.

आज्ञापालन
 हा सेवक प्रथमतः अतिशय आज्ञाधारक, नम्र, दक्ष आणि प्रामाणिक असला पाहिजे. 'पुढे पुढे निघू नये । आज्ञावेगळे वर्तू नये । न मनिता अपाय । नेमस्त आहे ॥' 'स्वामींनी जे जे बोलावे । तेचि सेवकी प्रतिष्ठावे ॥', 'समर्थांचे मनोगत । तैसेचि वर्तणे उचित । तेथे चुकता आघात । नेमस्त आहे ॥' अनेक सेवक फार गर्विष्ठ असतात. स्वामींना काय कळते, असे त्यांना वाटते. 'आम्हांप्रमाणे काय जाणे । प्रभू होय, परी काही नेणे । आम्हांवेगळे कोण शहाणे । आहे येथे !' असा तोरा ते मिरवतात. आणि प्रसंगी स्वामींनाच बुद्धी शिकवू लागतात. अशा सेवकांचा समर्थांनी कडक शब्दात निषेध केला आहे.

काही न मागे
 काही सेवक स्वार्थी, लाचखाऊ असतात. त्यामुळे कामाचा नाश होतो. 'आपस्वार्थ उदंड करणे । आणि स्वामिकार्य बुडविणे । ऐसी नव्हेत की लक्षणे । सेवकाची ॥' थोडी बहुत लालूच करणे । आणि महत्कृत्य बुडविणे । महत्त्व जाता लाजिरवाणे । जनांमध्ये ॥' असे सेवक राज्याचा घात करतात. 'कार्य करिता काही न मागे । तयाची चिंता प्रभूसि लागे । ऐसे जाणूनि विवेक जागे । म्हणजे बरे ॥' अशा वृत्तीचा सेवक असला पाहिजे. असा सेवकच मोठा कार्यकर्ता होऊ शकतो. सेवक तोचि अडेना- तो कोठे अडत नाही. स्वतःची बुद्धी चालवून 'काम चुकले हे घडेना, कदा काळी ॥' अशी काळजी घेतो. 'धूर्तपणे अंतरसाक्षी । नानाप्रकारे परीक्षी । दूरी गेला तरी लक्षी । सर्व काही ॥' सेवकांमुळेच राज्यकारभार उत्तम चालतो.

स्वामिनिष्ठा
 सेवकाचा सर्वात महत्त्वाचा स्वधर्म म्हणजे स्वामिनिष्ठा. आणि सर्वात मोठा दुर्गुण, सर्वात मोठे पाप म्हणजे फितुरी. समर्थ म्हणतात, सेवक विश्वास दाविती, वैरियाकडे