Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३६६
 

शास्त्राणां अविश्वासः परो मतः ।' असे महाभारतात सांगितले आहे. सावधता प्रकरणात समर्थांनी हेच तत्त्व सांगितले आहे. 'कोणाचा भरवसा न धरावा । आपुला आपण विचार पहावा ॥' समर्थ म्हणतात कार्यकर्ते जवळ करावे, पण 'शोधोनि पहावे कपटाविषयी ॥' 'परांतर नित्य पहात जावे. कारण लोकांची मने क्षणोक्षणी बदलत असतात. म्हणून 'पहिलेच पहावे । शोधिलेचि शोधावे । राजकारण ॥'
 राजकारणात धूर्त माणसेच टिकतात, विजयी होतात. येथे भोळेभाबडे, ढिले, गहाळ यांचे काम नाही. महाभारतात निरनिराळी उदाहरणे देऊन हे स्पष्ट केले आहे. घारीसारखी दृष्टी असावी, बगळ्याप्रमाणे निश्चल राहावे, कावळ्याप्रमाणे साशंक असावे आणि सर्पाप्रमाणे वक्रगतीने वागावे. लांडग्यासारखा अचानक हल्ला करावा आणि सशाप्रमाणे निसटून जावे आणि एकंदर सिंहासारखा पराक्रम करावा. तात्पर्यार्थ असा की सिंहाच्या क्षात्रधर्माला कोल्हा, लांडगा, बगळा, सर्प यांच्या राजनीतीची जोड पाहिजे. समर्थांनी निरनिराळ्या ठिकाणी हीच राजनीती सांगितली आहे.
 'ही धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, भोळ्या भावार्थे संभ्रमे, कैसे घडे ।' (दास १९.७) ही धूर्तपणाची कामे आहेत. म्हणून 'राजकारण करावे नेमे, ढिलेपणाच्या संभ्रमे, जाऊ नये ॥' 'दुर्जन प्राणी समजावे । परी प्रगट न करावे । सज्जनापरीस आळवावे । महत्त्व देऊनी ॥' दुर्जनास मनोमन ओळखावे, पण आपण ओळखले आहे, हे यांना कळू देऊ नये. मात्र डाव असा मांडावा की 'तयास देखता दुर्जन धाके । बैसती प्रचीतीचे तडाखे । बंड पापांडाचे वाखे । सहजचि होती ॥' (दास १९.९) अशा लोकांना अद्दल घडविलीच पाहिजे, पण ती गुप्तपणे 'करणे असले जरी अपाय । तरी बोलोनि दाखवू नये । परस्परेची प्रत्ययो । प्रचीतीस ॥'

गुप्तरूपे
 राजकारणात धूर्तपणासारखेच गुप्ततेलाही महत्त्व आहे. 'धूर्तासि धूर्तपण कळले । तेणे मनासि मन मिळाले । परी हे गुप्तरूपे केले । पाहिजे सर्वे ॥' यासाठी 'वेष धरावा बावळा । अंतरी असाव्या नाना कळा ।' धूर्ताशी मैत्री केली तरी ती गुप्तपणे करावी, त्याचप्रमाणे 'उदंड समुदाय करावे । परी गुप्तरूपे ।' संघटना बांधाव्या त्याही गुप्तपणे. आपली बाजू कमजोर असेल तेव्हा नमते घ्यावे. प्रतिपक्षीयांत मिसळावे, पण ते गुप्तपणे, आणि वेळ येताच उलटावे. 'मिळोनि जाऊनि मेळवावे । पडी घेऊनि उलथावे । काहीच कळो नेदावे । विवेक बळे ॥'

धटासि धट
 जशास तसे, हेही राजनीतीचेच एक तत्त्व आहे. परमार्थात ते अगदी वर्ज्य आहे. तेथे गाय आणि वाघ यांशी समबुद्धीनेच वागले पाहिजे. दिव्याने घरच्याप्रमाणे परावीयालाही उजेड दिला पाहिजे. पण ते परमार्थात. व्यवहारात, राजकारणात या धोरणाने