Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५७
महाराष्ट्रधर्म
 


अहंकार
 कीर्तीविषयीचा समर्थांचा दृष्टिकोन, भागवतधर्मीयांना कधीच मानवणार नाही. कारण कीर्तीमुळे अहंभाव पृष्ट होतो. तो तर परमार्थात सर्वस्वी त्याज्य. पण समर्थांना राजकारणासाठी, राष्ट्रकरणासाठी तो अहंकारच जागा करावयाचा आहे. म्हणून ते सतत सांगतात, 'मरावे परी कीर्तिरूपे उरावे', 'भला रे भला बोलती ते करावे,' 'चंदनासारखे झिजावे आणि भले म्हणोनि घ्यावे', 'लोकी मान्यता पावावे', 'बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे', 'धर्मस्थापनेची कीर्ती संभाळली पाहिजे', 'सामर्थ्ये यशकीर्तीची, प्रतापे सांडिली सिमा' अशी दिगंत कीर्ती व्हावी. आणि अशा कीर्तीसाठीच प्रयत्न पाहिजे ही कीर्ती, हे यश आपोआप मिळत नाही. 'बारा ओव्या शते' असे एक समर्थांचे प्रकरण आहे. त्यातील बाराव्या शतात 'प्रारब्ध-प्रयत्नी प्रयत्न-श्रेष्ठत्व' हाच विषय मांडला आहे. आक्षेप आणि उत्तर अशी त्याची रचना आहे. जे काही घडते ते प्रारब्ध, अदृष्ट, पूर्वदत्त, कर्म, कपाळाची रेखा यामुळे घडते असा पूर्व पक्ष आहे आणि त्याला पुढच्या ओळीत उत्तर आहे. कपाळीच्या रेखेविषयी समर्थ म्हणतात, ही रेखा काढणारा ब्रह्मदेव तरी प्रारंभी कोठे असतो, तो कोठे उभा राहतो ? आणि लिहितो कशाने ? यात काही अर्थ नाही. लोक मूर्खपणाने वागतात आणि मग प्रारब्धावर ढकलतात.
 मनाच्या श्लोकांत एके ठिकाणी त्यांनी म्हटले आहे, 'लोक म्हणतात, माणसाला जन्म देताना ब्रह्मदेव त्याच्या कपाळी लिहितो. पण मग ब्रह्मदेवाच्या कपाळी कोण लिहितो ? संहारकाळी शंकर सर्व जाळतो म्हणता, पण मग शेवटी शंकराला कोण जाळतो ?' (१७५).

साक्षेप
 यत्न, प्रयत्न, कष्ट यांच्या जोडीला अखंड सावधपण, साक्षेप, बुद्धियोग, जाणपण यांचीही समर्थांच्या धर्मात तितकीच आवश्यकता आहे. कारण, देशकालवर्तमान पाहून, समाजाचा ऐहिक उत्कर्ष डोळ्यांपुढे ठेवूनच धर्मनियम ठरवावयाचे असतात, हा श्रीकृष्ण, वेदव्यास यांचा सिद्धान्त समर्थांना पूर्णपणे मान्य होता. धर्मामुळे भूतांचा प्रभव- उत्कर्ष होतो, धर्मामुळे अर्थ आणि काम प्राप्त होतात, म्हणून धर्म आचरावा, असे व्यासमुनी सांगतात. समर्थांनी महाराष्ट्रधर्म याच पायावर उभारला असल्यामुळेच, त्यांनी सावधपण, साक्षेप यांवर सतत भर दिला आहे. दासबोधाच्या आरंभीच, या ग्रंथाच्या श्रवणाचे फल काय ते सांगताना, त्यांनी म्हटले आहे की याच्या श्रवणाने धूर्त, तार्किक, विचक्षण लोक समयो जाणती आणि आळशी तेचि साक्षेपी होती. मोक्ष, वैराग्य यांच्या लाभाबरोबरच या लाभाचा समर्थ उल्लेख करतात, यावरून त्याचे त्यांना तितकेच महत्त्व वाटत होते हे उघड आहे. हरिकथा- निरुपण आणि राजकारण यांच्याबरोबरच त्यांनी सावधपण आणि साक्षेप यांचे महत्त्व सांगितले आहे.