सदा ॥ सर्वासि राखणे राजी । सर्व काळ मृदूत्तरे । येकची जीव सर्वांचा, कट्टबंद टळेचिका॥' (समर्थ ग्रंथभांडार, उत्तरार्ध, पृ. ४०३ )
लोकांना शिकविणे, त्यांना जाणते करणे आणि मग त्यांना एकजीव करून दृढ कट्टबंदात ठेवणे- संघटित ठेवणे- हा समर्थांचा महामंत्र आहे. अशा रीतीने लोक आपल्यामागे आले की 'लोक हे राखता राजी । सर्व राजीच होतसे । अंतरे चुकता तेथे । सर्व भाजीच होतसे ॥ जन हे वोळतु तेथे । अंतरात्माचि वोळला । जन हे खौळले जेथे | अंतरात्माचि खौळला.' अशी मोठी शक्ती निर्माण होते व कार्य साधते (कित्ता, पृ. ३९९).
यासाठी 'समर्थांपासी बहुतजन । राहिला पाहिजे साभिमान । निश्चळ करूनिया मन । लोक असती.' ही विद्या शिवछत्रपतींना अवगत होती. 'बहुत जनांसी संभाळणे, बहुत जनांचे साहणे' हे त्यांना ईश्वराचे देणेच होते. म्हणूनच समर्थ त्यांच्याविषयी म्हणाले —— 'धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार । झाले आहेत पुढे होणार । देणे ईश्वराचे ॥' (दास. १८-६)
यावरून महाराष्ट्रधर्मांचे तिसरे लक्षण आपणांस कळून येईल. 'लोकजागृती, लोकसंघटना, बहुतजनांसी संभाळणे !' कारण लोक संघटित झाल्यावाचून बल, सामर्थ्य, शक्ती निर्माण होत नाही. आणि शक्ती नाही म्हणजे सर्व व्यर्थ.
(४) शक्ती
भीष्म, व्यास यांनी तर धर्मापेक्षाही बल श्रेष्ठ असा सिद्धान्त मांडला आहे. समर्थांनीही जवळ जवळ तोच भावार्थ प्रगट केला आहे. तुळजा भवानीच्या एका स्तोत्रात शक्तीविषयीचे आपले सर्व तत्त्वज्ञान त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, प्रपंच हा शक्तीने यशस्वी होतो. राज्ये मिळतात ती शक्तीने मिळतात. 'शक्तीने नेटका प्राणी वैभव भोगता दिसे.' अशक्ताला विचारतो कोण ? 'शक्त तो सर्वही भोगी, शक्तीविणा दरिद्रता ।' शक्तीला युक्तीची जोड पाहिजे हे खरे. पण 'शक्ती नसता विटंबना.'
शक्तीने मिळती राज्ये । युक्तीने यत्न होतसे ।
शक्ति युक्ति जये ठायी । तेथे श्रीमंत नांदती ॥
शक्ती व युक्ती यांविषयीचा आपला हा प्रसिद्ध सिद्धान्त समर्थांनी याच स्तोत्रात सांगितला आहे.
या शक्तीसाठीच दृढ आणि अभेद्य अशी लोकसंघटना असावी लागते. कारण, 'फितव्याने बुडती राज्ये' संघटनेत अनेक लोक चोरटे निघतात, लाचखाऊ असतात. त्यामुळे सेना बेदाद, बेकैदी होते. तेव्हा या लोकांना हाकून द्यावे आणि राजकारणी युक्तीने त्यांचा नाश करावा. सर्व लोकांची नीट परीक्षा करावी, विरोधी, कुटिल, खोचरे अशांना तांदुळातील खड्यासारखे बाजूला काढावे आणि संघटना अभेद्य राखावी. हे साधण्यासाठी युक्ती पाहिजे, राजकारण पाहिजे, पण त्या आधी शक्ती पाहिजे.