Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३४८
 

कराल, तरी तुम्ही कष्टी व्हाल.' 'प्रपंच सांडूनि परमार्थ केला, तरी अन्न मिळेना खायाला, मग तया करंट्याला, परमार्थ कैचा.' दासबोधातील बाराव्या दशकातील पहिला समास असल्या वचनांनीच भरला आहे. 'प्रपंची जो सावधान, तोचि परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण, तो परमार्थी खोटा ॥ म्हणोनि सावधपणे, प्रपंच परमार्थ करणे, ऐसे न करता भोगणे, नाना दुःखे ॥
 तेव्हा, 'आधी प्रपंच', हे महाराष्ट्रधर्माचे दुसरे लक्षण होय.

मतपरिवर्तन
 समर्थ रामदास स्वामी हेही वारकरीपंथीय संतांप्रमाणे प्रारंभी, संसार व परमार्थ यांत तीव्र विरोध आहे, असेच मानीत होते. त्यांची अनेक प्रकरणे, अनेक समास, संसारनिंदेने भरलेले आहेत. पण पुढे सर्व देशभर परिभ्रमण करताना, येथील अस्मानी- मुलतानी त्यांनी पाहिली तेव्हा, प्रपंचाचा पाया भक्कम असल्यावाचून परमार्थाच्या उपदेशाला कसलाच अर्थ नाही, हे त्यांच्या ध्यानी आले. आणि म्हणून त्यांनी 'आधी नेटका प्रपंच' हा सिद्धांत सांगण्यास प्रारंभ केला. रामदासस्वामींच्या मतात व तत्त्वज्ञानात हे जे परिवर्तन झाले त्याचे सविस्तर वर्णन प्रा. श्री. म. माटे यांनी आपल्या 'श्री रामदासस्वामींचे प्रपंचविज्ञान' या ग्रंथात केले आहे (प्रकरण ६ वें). डॉ. पेंडसे यांनी, प्रा. माटे यांच्या विवेचनाचा निर्देश करून, स्वतः तीर्थाटनामुळेच स्वामींच्या मनात पालट झाला, असाच अभिप्राय दिला आहे. पेंडसे यांनी याविषयी एक गंमतीचे प्रमाणही दिले आहे. प्रपंचात राहून परमार्थ साधणारा म्हणून राजा जनकाची कीर्ती आहे. समर्थांना प्रारंभी ती मान्य नव्हती. जनकाच्या आधारे, लौकिक प्रपंचाचे महत्त्व सांगणाऱ्यांवर, त्यांनी जुन्या दासबोधात टीका केली आहे (१८-३३). पण नव्या (म्हणजे प्रसिद्ध) दासबोधात, 'मागा होते जनकादिक, राज्य करि ताही अनेक, तैसेचि आता पुण्यश्लोक, कित्येक असती' असा जनकाचा गौरव केला आहे (१८-८) . (राजगुरु समर्थ रामदास, पृ. २१४-२१५ ).

गृहस्थाश्रम
 वृत्तीत असा पालट झाल्यामुळेच, प्रपंचाचे महत्त्व सांगताना, समर्थांनी गृहस्थाश्रमाची महती गायिली आहे. देव, ऋषी, मुनी, योगी, तापसी हे सर्व गृहस्थाश्रमातूनच निर्माण झाले, आणि तपस्वी झाल्यावरही ते या आश्रमाच्या आधारेच जगतात, असे त्यांनी बजावले आहे (दास. १४-७). संसाराची प्रारंभी अभद्र निंदा करणाऱ्या समर्थांनीच, 'मनासारिखी सुन्दरा ते अनन्या' हे काव्य लिहून समृद्ध संसाराचे बहारीचे वर्णन केले आहे. आणि मग प्रत्येक प्रसंगी इहलोक आणि परलोक प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा विवेक राखिला पाहिजे, असे सांगितले आहे.