Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३३८
 

भारतभूचे यथातथ्य, सविस्तर वर्णन करून, लोकांत विजीगिषू वृत्ती जागृत करून, त्यांनी या राजधर्माचा अग्रक्रमाने उपदेश केला असता. या राजधर्मात अग्रमान बल, सैन्य, लष्करी सामर्थ्य याला आहे आणि दुसरा मान कोश, धन, द्रव्य याला आहे. एका दृष्टीने, भीष्मांच्या मते, धर्मापेक्षाही बल हेच श्रेष्ठ होय, कारण बलाबाचून धर्म अनाथ होतो. ते म्हणतात,

अति धर्माद् बलं मन्ये, बलाद् धर्मः प्रवर्तितः ।
बले प्रतिष्ठितो धर्मो, धरण्यां इव जंगमम् ॥

धर्मापेक्षा बलाची योग्यता जास्त आहे. कारण बलाच्या योगानेच धर्माची प्रवृत्ती होते. ज्याप्रमाणे जंगम पदार्थ व प्राणी पृथ्वीच्या आश्रयाने राहतात, त्याचप्रमाणे धर्म बलाच्या आश्रयाने राहतो. यस्यैव बलभोजश्च स धर्मस्य प्रभुः नरः । असे विचार महाभारतातील राजधर्म पर्वात सारखे आढळतात.

कोश
 जे बलासंबंधी तेच कोशासंबंधी, धनासंबंधी राजाचे मुख्य बल म्हणजे कोश. लष्करी बलाला त्याचाच आधार असतो. आणि या बलाच्या आधारे धर्म टिकतो व धर्माच्या आधारे प्रजा टिकतात. तेव्हा जे कोशाचे हरण करतात त्यांना ठार मारल्यावाचून यश कधीच मिळणार नाही. हे राजा ध्यानात ठेव की धनाच्या योगानेच हा लोक आणि परलोक हे जिंकता येतात (शांतिपर्व १३०-३६, ४३, ४४,). संतांना ऐश्वर्याचे ते तत्त्व मान्य होईल काय ?

बुडबुडा
 संतांनी देशकालपरिस्थितीचे वर्णन करून, मुस्लिम आक्रमणांचे स्वरूप स्पष्ट करून प्रत्यक्ष असा राजधर्माचा उपदेश कोठेही केलेला नाही. ज्ञानेश्वरांच्या काळात महाराष्ट्र स्वतंत्र होता हे खरे. पण मंदिरे पाडून मशिदी उभारणे हे यादव राजांच्या डोळ्यांपुढे चालू होते. सूफीपंथ हिंदूंना बाटविण्याचाही उद्योग करीत होता. आणि दुसरे म्हणजे वायव्येकडून मुस्लिमांची आक्रमणे तीनशे वर्षे उत्तर भारतावर चालू होती. तेराव्या शतकाच्या आरंभी तर दिल्लीला मुस्लिम सत्ताही स्थापन झाली होती. ज्ञानेश्वर उत्तर हिंदुस्थानची यात्रा करून आले तेव्हा ही टोळधाड लवकरच दक्षिणेवर येणार, हे काय त्यांच्या ध्यानात आले नसेल ? त्या ज्ञानियांच्या राजाविषयी असे म्हणणे केव्हाही योग्य होणार नाही. ऐहिक ऐश्वर्याचा विचार त्यांच्या मनात असता तर त्यांनी परत येताच त्या वेळच्या रामदेव यादवाला सावध केले असते. पुढे यादवांचे राज्य बुडाल्यावर त्यांच्याच वंशातील एक गोविंद देव याने काही काळ खानदेशात स्वतंत्र राज्य स्थापिले होते. नामदेव आणि ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील इतर संत यांनी जनतेत राजकीय जागृती करून गोविंद देवाला प्रोत्साहन द्यावयास हवे