Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२९
संतकार्य-चिकित्सा
 

त्यांचे गुरू होते. त्यांना गहिनीनाथांपासून दीक्षा मिळाली. नाथपंथाची अशी परंपरा चालू झाली असली तरी, भिक्षाटन, संन्यास, हटयोग, यांवर त्या पंथाचा भर असल्यामुळे, सर्व समाजात त्याचा वारकरी पंथासारखा प्रसार झाला नाही. दत्त- संप्रदायाचे तेच झाले. दत्ताची उपासना प्राचीन काळापासून रूढ झालेली आहे. पंधराव्या शतकाच्या मध्याला त्याला काहीसे व्यवस्थित रूप नरसिंह सरस्वती यांनी दिले. पण त्यांचा ग्रंथ एकही उपलब्ध नाही. त्यांच्या आचारविचारांविषयी माहिती सरस्वती गंगाधराचा मागे सांगितलेला ग्रंथ 'गुरुचरित्र' यावरूनच फक्त मिळते. ती पाहता हा पंथ कडक आचारधर्म, कर्मकांड, अतिरेकी सोवळे ओवळे यांवर भर देतो आणि ब्राह्मणवर्णाची उन्नती एवढेच त्याचे ध्येय आहे असे दिसते. त्यामुळे त्याचाही बहुजनांत प्रसार झाला नाही.

पंढरीकडेच
 वारकरी पंथाच्या प्रसाराचे आणखी एकम हत्वाचे कारण म्हणजे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम यांसारखे थोर संत त्याला एकामागून एक लाभले. महाराष्ट्रात इतर कोणत्याच पंथाला हे भाग्य लाभले नाही. मौजेची गोष्ट अशी की वारकरी पंथाचे दोन मोठे नेते जे ज्ञानेश्वर व एकनाथ हे मूळचे नाथ व दत्त संप्रदायाचे अनुयायी होते. पण त्यांनी ध्वजा धारण केली ती वारकरी पंथाची. वर वर्णन केलेल्या त्या पंथाच्या मर्यादा त्यांनी जाणल्या आणि अखिल महाराष्ट्राला धर्मदीक्षा द्यावयाची तर ती वारकरी पंथाची, विठ्ठलसंप्रदायाचीच दिली पाहिजे, नाथ किंवा दत्त यांमध्ये बहुजनांना ओढून घेण्याचे सामर्थ्य नाही, हे ध्यानी घेऊन त्यांनी वारकरी पंथाच्या प्रसारासाठीच सर्व शक्ती वेचावयाची, असे ठरविले. तुकारामांनाही गुरूपदेश मिळाला तो चैतन्यसंप्रदायाच्या पुरुषाकडून; वारकरीपंथाकडून नव्हे. पण त्यांनाही धर्मरक्षणासाठी आटी करावयाची होती. त्यामुळे त्यांनीही पढरीकडेच महाराष्ट्र समाजाचा ओघ वळविला.

बहुजनांत
 वारकरी पंथाच्या प्रसाराच्या दृष्टीने नामदेवांच्या कार्याचे मला सर्वात जास्त महत्त्व वाटते. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहून पंथाचे तत्त्वज्ञान निश्चित केले. पण समाजमनात ते दृढमूल करण्याचे कार्य सर्वस्वी नामदेवांचे आहे. स्वतः नामदेव हीन गणलेल्या यातीचे होते. असा पुरुष सुंभाचा करदोटा व रकट्याची लंगोटी लावून वाळवंटी कीर्तनास उभा राहिलेला पाहून बहुजनसमाजात कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला असला पाहिजे. पुढे ज्ञानेश्वर त्याला सखा मानतात, ब्राह्मण लोकही त्याचे शिष्य होतात, हे पाहून तो शतपटीने दृढावला असला पाहिजे. शिवाय, 'नामयाची वाणी, अमृताची खाणी', हे बळ त्याच्याजवळ होतेच. तेव्हा महाराष्ट्राला वार-