पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२५
संतकार्य-चिकित्सा
 

अधिकार भेद सांगितलाच आहे. तेव्हा धार्मिक क्षेत्रात सर्वांना अधिकार आहे याचा अर्थ इतकाच की विठ्ठलाची भक्ती करून सर्वांना सम मोक्ष प्राप्त करून घेण्यास मोकळीक आहे. विठ्ठलाच्या पायाशी सर्व सारखे याचा अर्थ विठ्ठलमंदिरात सर्वांना प्रवेश आहे इतका सुद्धा नाही. अस्पृश्यांना कोणत्याही मंदिरात प्रवेश नव्हता. कारण ते आत गेले असते तर इतरांना विटाळ झाला असता आणि असा विटाळ होणे संतांना भुळीच मान्य नव्हते. 'चारी वर्णाचा एक मेळु होईल, कोणी कोणाचा विटाळु न धरील', हे कलियुगाचे लक्षण म्हणून नामदेवांनी सांगितले आहे. तुकारामांनीही, वर्णधर्म कोणी पाळीत नाहीत म्हणून, खेद व्यक्त केला आहे. 'वर्णधर्म कोणी न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायी ॥' असे ते म्हणतात. सर्वांनी एकत्र भोजन करणे हे कलियुगाचे लक्षण, असे त्यांनी सांगितले आहे. 'ऐका कलीचे हे फळ । पुढे होईल ब्रह्मगोळ । चारी वर्ण अठरा जाती । भोजन करिती एके पंक्ती ॥'

जरी ब्राह्मण-
 सर्व संतांच्या मनाला वर्णजातिविषमतेमुळे अतिशय दुःख होते. पण शास्त्राविषयी त्यांना आदर व श्रद्धा असल्यामुळे, व्यवहारातही समता पाळावी, हे त्यांना सांगता येत नव्हते. ते दुःख आणि ही श्रद्धा यांमध्ये त्यांच्या मनाची ओढाताण होत आहे हे पावलोपावली जाणवते.
 'वर्ण अभिमाने कोण जाले पावन ?' असा प्रश्न विचारून, 'अंत्यजादि योनी तरल्या हरिभजने' असे तुकाराम सांगतात; आणि रोहिदास चांभार, चोखा मेळा, बंका महार यांची उदाहरणे देतात. याशिवाय गोरा कुंभार, सेना न्हावी, दादू पिंजारी, कबीर यांचे पुरावे देतात. कोठे कोठे, 'गुणअवगुण हे दोन्ही प्रमाण । यातीशी कारण नाही देवा ॥' असे स्पष्ट सांगतात. पण रूढ धर्मशास्त्राकडे मन ओढताच, 'ब्राह्मणे ब्राह्मण सद्गुरू करावा । परी न करावा शूद्रादिक ॥' असा उपदेश करतात. आणि 'जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, तुका म्हणे श्रेष्ठ तीन्ही लोकी ॥' असाही निर्वाळा देतात.

नवी उभारी
 पण हे ध्यानात घेऊनही, केवळ मोक्षाच्या व भक्तीच्या दृष्टीने का होईना, पण त्यांनी वर्णसमतेचा पुरस्कार केला आणि भेदाभेद अमंगळ आहेत असे म्हटले, यासाठी सुद्धा महाराष्ट्र त्यांचा ऋणी राहील. हरीचा भक्त पापयोनी असला तरी तो श्रेष्ठच होय, ब्राह्मणाच्या योग्यतेचा होय, असे त्यांनी सांगितल्यामुळे चोखा मेळा, बंका, रोहिदास यांसारख्या हीन गणलेल्या जातीच्या लोकांना एक प्रकारची उभारी आली, उल्हास आला आणि 'सगुण, निर्गुण, सर्वाभूती एक आत्मा', 'नामाचिया बळे कळिकाळाच्या माथा सोटे मारू', 'सर्व घटी राम, जीवशीव सम, सर्व रूपे ब्रह्म