Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
 

सारखे हत्यार, बाणाचे फाळ, चामडी छिलण्याचे धारदार हत्यार अशीही दगडी हत्यारे सापडतात. त्याचप्रमाणे जनावरांची अश्मीभूत हाडेही सापडतात. अश्मयुगाच्या अगदी उत्तर काळात येथील आदिमानवाने भटकी वृत्ती टाकून देऊन शेतीचा अवलंब केला असे त्या काळच्या हत्यारांवरून व धान्य, भुसा यांच्या अवशेषांवरून दिसते. यानंतर ताम्रपाषाणयुग सुरू होते. या युगातील मानव घरे बांधून राहात होता. रांजण, परात, वाडगा इ. मातीची भांडी करीत होता. त्यावर मोर, हरिण, वाघ यांची चित्रेही काढीत होता. या काळात त्याला तांब्याची हत्यारे करण्याची कलाही अवगत झाली होती. या तांब्याच्या हत्यारांमध्ये तांब्यात कथलाचे मिश्रण केलेले आढळते. धातूंचे मिश्रण करणाची विद्या हे बऱ्याच प्रगतीचे लक्षण आहे
 या युगातील उत्खननात जे अवशेष सापडले त्यांवरून त्या काळच्या मानवाच्या जड, भौतिक संस्कृतीचाच फक्त अंदाज बांधता येतो. त्याच्या मानसिक प्रगतीचा फारसा पत्ता लागत नाही. तरी मरणोत्तर जीवनावर त्याची श्रद्धा असावी असे, मृतांबरोबर गाडगी, मडकी, खेळणी, दागिने इ. वस्तू पुरलेल्या आढळतात, त्यावरून अनुमान होते. त्याचा धर्म हा जादूटोण्याच्या पायरीवरच असावा, असे काही अवशेषांवरून वाटते. यापलीकडे त्याच्या आध्यात्मिक अवस्थेविषयी, वैचारिक धनाविपयी काही ज्ञान उपलब्ध होत नाही.

त्र्यंबकेश्वर ?
 इ. स. पू. १००० वर्षांच्या मागल्या अतिप्राचीन काळातील महाराष्ट्रातील मानवी संस्कृतीचे हे चित्र आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजातील पुराणवस्तुसंशोधन व प्राचीन भारतीय इतिहास या विषयाचे प्राध्यापक डॉ. शां. भा. देव यांनी 'महाराष्ट्रातील उत्खनने ' या आपल्या व्याख्यानमालेत प्राचीन महाराष्ट्र-संस्कृतीचे वरील प्रकारे वर्णन केले आहे. हे वर्णन करताना त्या जागी त्यांनी आवर्जून सांगितले आहे की महाराष्ट्रातील त्या काळची संस्कृती दक्षिणेतील इतर प्रांतांतील संस्कृतीपेक्षा कोणत्याच प्रकारे निराळी दिसत नाही. म्हणून या संस्कृतीकडे प्रादेशिक दृष्टीने बघून चालणार नाही. अश्मयुगातील दगडी हत्यारांचे वर्णन झाल्यावर ते सांगतात की यावरून दिसणारी महाराष्ट्रातील मानवाची संस्कृती त्याच्या इतर भाऊबंदांसारखीच होती. ताम्रपाषाणयुग हे तर तीनसाडेतीन हजार वर्षांपूर्वीचेच आहे. या काळात उत्तरेकडे आर्यांची संस्कृती पुष्कळच विकसित झाली होती. त्या वेळी दक्षिणेत महाराष्ट्रातील मानव सुसंस्कृत व स्थिर जीवन जगत होता, असे स्वतः डॉ. देवांनीच म्हटले आहे. तरीही ताम्रपाषाणयुगातली ही महाराष्ट्रातील संस्कृती ताम्रपाषाणयुगातल्या इतर प्रांतांतल्या व देशांतल्या संस्कृतीपेक्षा भिन्न नव्हती, असेच त्यांनी आपले मत दिले आहे. आणि आपल्याला तर महाराष्ट्राच्या पृथगात्मतेच्या प्रारंभाचा शोध घ्यावयाचा आहे. आकाशातून पर्जन्यकाळी अनंत जलधारा वर्षत असतात. सर्व नद्यांना त्यांतूनच पाणी मिळते. पण