डॉ. शं. दा. पेंडसे यांनी केले आहे. 'वैदिक वाङ्मयातील भागवतधर्माचा विकास आणि 'पौराणिक भागवत धर्म ' हे दोन आणि ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतांच्या कार्याविषयी चार असे या विषयावर सहा ग्रंथ लिहून त्यांनी या विषयाचे अगदी सांगोपांग आणि विद्वत्तापूर्ण विवेचन केले आहे. त्यांच्या मते वेद व गीता यांतील भागवतधर्म हा प्रवृत्तिवादी आहे, त्याला निवृत्तिवादी रूप भागवत पुराणाने दिले. पण संतांनी, भागवत पुराणाचा महिमा त्यांना मान्य असूनही, वैदिक, प्रवृत्तिवादी भागवतधर्माचाच पुरस्कार केला. 'ज्ञानेशांचा कर्मयोग' आणि (एकनाथांचा) 'भागवत आणि कर्मयोग,' या त्यांच्या ग्रंथांतील प्रकरणांत त्यांनी आपल्या मताची सविस्तर मांडणी केली आहे. संतांनी वेद-गीताप्रणीत कर्मयोगाचेच प्रतिपादन केले आहे. या त्यांच्या मताची थोडी चर्चा करू. पण संतांनी संसारत्यागाचा निषेध केला आहे, संन्यासमार्गाला विरोध केला आहे, याविषयी वादच नसल्यामुळे, त्या विषयाचे सरळ प्रतिपादन येथे केले आहे.
अलिप्त कमळ
'न लगे लौकिक सांडावा व्यवहार | ध्यावे वनांतर भस्मदंड ॥' असे तुकारामांनी सांगितले आहे. मोक्ष मिळवण्यासाठी, परमेश्वरप्राप्तीसाठी लौकिक व्यवहार म्हणजे संसार सोडावा लागतो, अंगाला भस्म फासून, हातात दंड घेऊन अरण्यात जावे लागते, असे नाही. संसारात राहूनही नित्य नामस्मरण करीत राहिले तर परमेश्वर प्रसन्न होतो. 'सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे । घडे ज्या उपकार, भूतांची ते दया, आत्मस्थिती तया अंगी वसे ॥' या एका अभंगात संसाराविषयीचे संतांचे सर्व प्रतिपादन आलेले आहे. भक्तांनी संसारातच राहावे, पण कशाविषयी आसक्ती ठेवू नये भोगविषयांच्या आहारी जाऊ नये. वासनांचे गुलाम होऊ नये. व्यवहार करायचा तो सत्याने, नीतीने करावा, भूतदया सतत चित्तात ठेवून परोपकार करीत राहावे. ज्या मनुष्याचे असे आचरण आहे तो, संसारात असूनही, मुक्तच आहे.
इंद्रियांचा जय
संतांचा मुख्य कटाक्ष आहे तो मनोनिग्रहावर, वासनाजयावर आहे; संसाराच्या प्रत्यक्ष त्यागावर नाही. कारण संसारत्याग करून माणूस वनात गेला तरी, त्याच्या वासना प्रबळ असतील तर, तेथेही तो भोगाधीन होतोच. तेथेही तो अनाचार करतोच. उलट इंद्रियांचा जय करून तो संसार नीतीने करील राहिला, स्वकर्मकुसुमांनी परमेश्वराची भक्ती करीत राहिला तर संसारातील भोग मोक्षाच्या आड येत नाहीत. एकनाथ म्हणतात –
'सकळ सांडूनि वना गेला । वनी वनिता चिंतू लागला ॥' तर काय उपयोग ? 'अशा मूर्खासि त्याग तो झाला बाध' अशाला त्याग हा घातकच ठरणार. कारण
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३३५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३१०