Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२९८
 

अशी ही व्रते सर्व वर्णाना अवश्य आहेत. नवरात्राविषयी सांगताना हेमाद्री म्हणतो, सर्व जनांनी प्रत्येक स्थानी, प्रत्येक नगरी, प्रत्येक ग्रामी, वनी, गृही नवरात्र करावे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांनी व भक्तियुक्त म्लेच्छांनीही देवीपूजन करावे. देवीपुराण म्हणते, जो मनुष्य अज्ञानाने, आळसाने, दंभाने, द्वेषाने दुर्गादेवीचे पूजन करीत नाही, त्यावर भगवती क्रुद्ध होऊन त्याच्या इष्ट मनोरथांचा नाश करते. शिवरात्रिव्रताचा महिमा असाच आहे. या व्रताच्या व त्याच्या पारण्याच्या तिथीविषयी इतर व्रतांप्रमाणेच नियम आहेत. ते मोडले तर सर्वनाश होतो. असे व्रत ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत सर्वांना भुक्ती व मुक्ती देते.

वर्ज्यावर्ज्य
 खाण्यापिण्याप्रमाणेच इतर कृत्याकृत्यांचे नियम आहेत आणि तेही असेच अर्थशून्य आहेत. मंगळवार, गुरुवार, रविवार, अमावास्या, पौर्णिमा, संक्रांती, द्वादशी या दिवशी तुळशीपत्र तोडू नये. ज्यांनी तसे तोडले त्यांनी, भगवंताचे मस्तक तोडले, म्हणून समजावे. रविवारी दुर्वा तोडली व कार्तिकात आवळीचे पान तोडले तर मनुष्य अतिनिंद्य अशा नरकास जातो. शिक्षा अशा भयंकर असल्या तरी, त्या बाबतीतही, मतभेद आहेतच. 'स्मृतिसार' या ग्रंथान्वये, अमावास्येला तुळशीपत्र तोडणे निंद्य होय, तर 'विष्णुधर्मा' अन्वये त्या दिवशी तुलसीपत्र तोडण्यास हरकत नाही. दात धुण्याविषयी असेच विधिनिषेध आहेत. प्रतिपदा, षष्ठी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या दिवशी काष्ठाने दंतधावन करू नये. या तिथींत नारदपुराणाने एकादशी व पौर्णिमा यांची भर घातली आहे. शनी, रवी, मंगळ, शुक्र या दिवशी काष्ठाने दंतधावन करू नये, असे वसिष्ठाचे मत आहे. ज्या स्त्रीचा पती प्रवासात आहे तिला काष्ठ- दंतधावन वर्ज्य. श्राद्धकाळ, विवाहकाळ, सुतक या काळी हाच नियम आहे. हेमाद्रीच्या मते उपवास दिवस, श्राद्ध दिवस यांचे ठायी काष्ठाने दंतधावन करू नये. मातीने दात धुवावे. काष्ठाने धुतल्यास सात कुलांचा नाश होतो. व्यासांच्या मते कोणतेही व्रत घेतले असता, स्त्रियांनी दंतधावनच करू नये. (निर्णयसिंधू, पृष्ठ ३९८, ५०, ३० ). अभ्यंग स्नानाविषयी शास्त्रीपंडितांनी असाच गंभीर विचार केला आहे. आवळे वाटून अंगाला लावून स्नान करणे उत्तम. पण सप्तमी, नवमी, पर्वकाल, ग्रहणे या वेळी हे आमलक स्नान एका ग्रंथाने वर्ज्य सांगितले आहे, तर दुसऱ्याने प्रतिपदा, तृतीया, नवमी, दशमी, कृष्ण द्वादशी, त्रयोदशी या तिथींना ते वर्ज्य सांगितले आहे. अमावास्येला आमलक स्नान केले तर मातापित्यांच्या आयुष्याचा क्षय होतो.

विकृत धर्म
 धर्माविषयी या शास्त्री पंडितांच्या कल्पना किती विकृत होत्या हे यावरून दिसून येईल. धर्म म्हणजे मनाची उन्नती, मनाचा विकास, धर्म म्हणजे सद्गुण-संवर्धन, प्रज्ञाबल,