'महाराष्ट्र संस्कृती' चा इतिहास या ग्रंथात जो द्यावयाचा आहे तो लिहिताना हेच तत्त्व सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि वाचकांनी ग्रंथ वाचताना ही दृष्टी ठेवूनच तो वाचावा अशी ग्रंथकर्त्याची त्यांना विनंती आहे.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास हा या ग्रंथाचा विषय आहे. मराठ्यांच्या संस्कृतीचे दर्शन या ग्रंथात घडवावयाचे आहे. पण विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी महाराष्ट्र व संस्कृती या दोन शब्दांची विवक्षा स्पष्ट करून घेणे अवश्य आहे. या विवक्षा निश्चित झाल्या की विषयाचा पूर्ण व्याप डोळ्यांपुढे उभा राहील.
चतुःसीमा
आज महाराष्ट्र याचा अर्थ निश्चित झालेला आहे. त्याच्या चतुःसीमा ढोबळपणे सर्वमान्य झालेल्या आहेत. बेळगाव, कारवार, गोवा यांच्याविषयी वाद असला तरी तो राजकीय क्षेत्रातला आहे; सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने त्याला महत्त्व नाही. हे ध्यानात घेऊन महाराष्ट्र म्हणजे कोणता प्रदेश हे निश्चितपणे आज सांगता येईल. गोवा ते दमण ही रेषा याची पश्चिम सीमा आहे. ती सिंधुसागराने निश्चित केली आहे. सातपुडा व त्याच्या पायथ्याशी वाहणारी तापी नदी ही याची उत्तर सीमा आहे. ती साधारण ८० रेखांशापर्यंत जाते. महाराष्ट्राची पूर्व सीमा अशी सरळ नाही. गोवा-कारवारपासून ती सोपानाप्रमाणे पायरीपायरीने चढत जाते. कारवार, सोलापूर बेदर, माहूर, चांदा, भंडारा अशा त्या सोनानपरंपरेतील पायऱ्या आहेत. तेव्ह, आजच्या महाराष्ट्रभूमीच्या सीमा अशा निश्चित आहेत. पण आपल्याला इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून आजमितीपर्यंत सुमारे दोन सव्वादोन हजार वर्षाच्या संस्कृतीचा इतिहास पहावयाचा आहे. तेव्हा त्या काळी महाराष्ट्राच्या सीमा कोणत्या होत्या, त्या कशाने निश्चित झाल्या होत्या, त्या प्रारंभकाळी या भूमीला हेच नामाभिधान होता काय, असल्यास ते कशावरून पडले होते इ. प्रश्न उपस्थित होतात. त्या काळापासून इतिहास लिहावयांचा तर या प्रश्नांचा निर्णय आधी केला पाहिजे. म्हणजेच महाराष्ट्र या शब्दाची विवक्षा आधी निश्चित केली पाहिजे.
संस्कृतीची व्याख्या
संस्कृती या शब्दाचे तसेच आहे. मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती, आध्यात्मिक व आधिभौतिक शक्तींना सामाजिक जीवनास उपयुक्त बनविण्याची कला म्हणजे संस्कृती, राष्ट्रातील विद्वानांचे, ऋषींचे, धर्मज्ञांचे विचार, त्यांची ध्येये, त्यांचे मार्ग व त्यांना अनुसरून राष्ट्रात झालेला आचार यांनी संस्कृती बनते, अशा संस्कृतीच्या निरनिराळ्या व्याख्या पंडितांनी केलेल्या आहेत. इंग्रजीत कल्चर