Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२८२
 

झाली असती. शिवछत्रपतींची एकट्याची शक्ती कार्य करीत होती तेथे आता तिघांची शक्ती एकवट होऊन तिचा प्रभाव दसपट शतपट झाला असता. पण असे काही घडले नाही. आणि राजांनी उलट शिवाजी राजांनाच कोंडाणा किल्ला सोडून देण्याचा उपदेश केला !
 १६५० सालानंतर दर क्षणाला शहाजी राजांविषयी, त्यांनी छत्रपतींना सामील व्हावयास हवे होते, असे इतिहास वाचताना वाटते. त्यातला एक क्षण तर विशेषच होता. १६५९ साली अफजलखान शिवाजी राजांवर चालून आला होता. ते पाहून खानाच्या विश्वासघातकी व खुनी स्वभावाची चांगली ओळख असल्यामुळे, तो वाईला गेल्याचे कळताच शहाजी राजे सतरा हजार सैन्यानिशी विजापुरावर चालून जाऊ लागले. पण राजे अर्ध्या रस्त्यावर येत आहेत नाहीत तोच शिवाजीराजांनी खानाचा निकाल उडविल्याची बातमी मिळाली. तेव्हा शहाजीराजे माघारी गेले. (बेंद्रे, मालोजीराजे व शहाजी महाराज, पृ. ५६९)
 या वेळी राजे माघारी गेले याचा अर्थ काय ? विजापूरवर हल्ला करून ते जिंकण्याची यापेक्षा जास्त चांगली संधी कोणती होती ? शहाजी राजांनी तसा हल्ला केला असता तर ते राज्यसंकल्पक म्हणून न राहता राज्यसंस्थापकच झाले असते, आणि विक्रम, शालिवाहन यांच्या पंक्तीत निश्चित जाऊन बसले असते. कारण तो क्षणच असा होता की भारताचा इतिहासच तेथे बदलला असता.
 हा सर्व इतिहास वरील थोर पंडितांच्या आधारे- त्यांच्याच ग्रंथांच्या आधारे- मांडला आहे. या घटनांचे वर्णन त्यांनी स्वतः केले असताना, त्यांनी शहाजी राजांना हिंदवी स्वराजाच्या स्थापनेचे श्रेय द्यावे याचा उलगडा होत नाही. शिवछत्रपतींच्या असामान्य कर्तृत्वाची मीमांसा पैतृक गुणसंपदा दाखविल्यावाचून होत नाही, असा तर त्यांचा समज नसेल ना ? थोर पित्याच्या पोटीच थोर पुरुष निर्माण होतात, असा सिद्धान्त तर त्यांच्या मनाशी नसेल ना ? व्यास, वाल्मीकी, सातवाहन, चंद्रगुप्त, ज्ञानेश्वर, तुकाराम यांनी व जगातल्या अनेक महापुरुषांनी हा समज भ्रामक आहे हे वेळोवेळी दाखविले आहे. मग शिवछत्रपतींचे कर्तृत्व स्वयंभू होते असे मानण्यास प्रत्यवाय का असावा ?

वैयक्तिक धर्म
 निंबाळकर, घाटगे, माने, जाधव, भोसले ही मराठा घराणी अत्यंत पराक्रमी होती. बहामनी राज्याची स्थापना झाली तेव्हापासून, व काही घराण्यांत त्याच्या आधीपासूनच, अनेक थोर, पराक्रमी, शौर्यधैर्यसंपन्न पुरुष निर्माण होत होते. तरी त्यांना स्वराज्य- स्थापना करता आली नाही. मुस्लिमांच्या आक्रमणापासून महाराष्ट्राचे व भारताचे रक्षण करता आले नाही. याचे कारण एकच की या सरदारांना क्षात्रधर्माचा, राजधर्माचा विसर पडला होता. रणात पराक्रम करणे, लढाईत तलवार गाजविणे, युद्धात