तीन कारणे
या तीन थोर इतिहास संशोधकांच्या या विधानांचे, त्यांनी भोसले घराण्याचा जो इतिहास दिला आहे, त्याच्याच आधारे, परीक्षण केले तर, ती विधाने सार्थ आहेत, असे दिसत नाही. असे म्हणण्याची तीन कारणे प्रथम मांडतो आणि मग त्यांचे सविस्तर विवरण करू. (१) शहाजी राजांनी निजामशाही, आदिलशाही आणि मोगल अशा तीन सत्तांची सेवा केली. या तीनही सत्तांनी अनेक वेळा त्यांचा वाटेल तो अपमान, उपमर्द केला होता. त्यांची जहागीर जप्त करणे, अत्यंत हीन मुस्लिम सरदारांच्या हाताखाली त्यांना काम देणे, येथपासून त्यांना बेड्या घालून कैदेत टाकणे, येथपर्यंत वाटेल तसा अपमान या सत्ता करीत असत. तरी एकाही प्रसंगी राजांनी स्वतंत्र होण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. एका शाहीकडून दुसरीकडे, तिच्याकडून तिसरीकडे किंवा परत पहिलीकडे, अशा येरझारा करून ते कोणाच्या तरी आश्रयालाच जात. (२) विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाल्यावर राजघराण्यातील राजपुत्र व इतर अनेक सरदार दक्षिणेत स्वतंत्रपणे राज्ये स्थापून राहिले होते. या सर्व राज्यांना संघटित करून, त्यांचे नेतृत्व करून 'हिंदुपदपातशाही' किंवा 'हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याऐवजी शहाजीराजे यांनी आदिलशाही मार्फत स्वाऱ्या करून, ही सर्व स्वतंत्र हिंदू राज्ये बुडविली ! आणि (३) १६४५ सालापासून त्यांचे पुत्र शिवछत्रपती यांनी 'हिंदवी- स्वराज्या'चा उद्योग आरंभिला असताना, आणि त्या वेळी २० हजारापर्यंत जय्यत लष्कर जवळ असताना, शहाजी राजे त्यांच्या कोणत्याही मोहिमेत या लष्करासह सामील झाले नाहीत.
शहाजी राजे स्वराज्य संकल्पक असते, कृतीने ते छत्रपती झालेच होते हा दावा खरा असता, विक्रम, शालिवाहन यांच्यापेक्षा ते श्रेष्ठ असते, हिंदवी स्वराज्याचा मुहूर्त त्यांनी पुत्राकडून करविला असता, तर वरील प्रकार घडले नसते.
वर तीन मुद्दे मांडले आहेत. त्यांचा थोड्या तपशिलाने आता विचार करू.
उत्तम संधी
(१) १६२४ साली भातवडीच्या संग्रामात शहाजी राजे प्रथम उदयास आले. त्या वेळी मोगल व आदिलशहा यांच्या फौजा एक झाल्या होत्या. निजामशाही नष्ट करण्याचा त्यांचा डाव होता. वजीर मलिकंबर हा त्यांना सवाई भेटला. त्याने या दोन्ही फौजांचा निःपात केला. या यशाचे श्रेय मलिकंबर इतकेच इतिहासकारांच्या मते, शहाजी राजांना आहे. पण यामुळेच त्यांच्या डोळ्यांत ते सलू लागले. तो त्यांचा पदोपदी अवमान करू लागला. त्याची जहागीरीही त्याने काढून घेतली. तेव्हा राजे निजामशाही सोडून आदिलशहाच्या आश्रयास गेले. त्या वेळी आदिलशहाने त्यांना सरलष्कर म्हणजे सेनापती नेमून, मावळप्रदेश हस्तगत करण्याची कामगिरी सांगितली. या वेळी
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३०३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२७८