Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२७४
 

विजापूरची चाकरी करण्याची प्रेरणा दिली, एवढेच नव्हे तर इब्राहम स्वतःला जगद्गुरू म्हणवीत असे, त्यालाही श्रींची मान्यता होती ! काळे रामेश्वरभट, परशुरामभट व वेदंभट असे तीन हिंदू ब्राह्मण सत्पुरुष घाटगे कुळातल्या सरदारांची चिंता वहात असत. पण त्या चिंतेची परमोच्च महत्त्वाकांक्षा आदिलशहा, निजामशहा यांच्या पदरी सरदारी मिळविणे एवढीच होती. सार्वभौमत्व, हिंदुधर्माला आलेली ग्लानी नष्ट करणे, असे विचार त्यांच्या स्वप्नातही कधी आले नाहीत.
 वर सांगितलेले राजजी घाटगे हे विजापूर दरबारी सरदार असता शिवछत्रपतींचा उदय झाला. पण त्यांचे गुरु वेदंभट यांनी, त्यांना महाराजांना जाऊन मिळण्याची प्रेरणा दिली नाही. राजजी अफजुलखानाबरोबर स्वारीत होते आणि शेवटपर्यंत त्यांनी विजापूरशीच आपले इमान राखले. (मुसलमानी अमदानीतील मराठे सरदार, द. ब. पारसनीस. मराठा सरदार घराण्यांची माहिती या पुस्तकातून घेतली आहे.)

राजा - किताब
 निंबाळकर, शिरके, घाटगे यांच्याप्रमाणेच म्हसवडचे माने हेही अस्सल मराठा क्षत्रियांचे घराणे होय. त्यातील एक मनुष्य सिदोजी याने, म्हसवड महालाचा अंमलदार सुजातमिया याच्या हाताखाली पराक्रम करून, विजापूर दरबारी प्रवेश मिळविला व बहुत कीर्ती संपादन केली. बेरदचा एक सुभेदार हुशेनशा म्हसवडवर चालून आला. त्या वेळी वणगोजी नाईक निंबाळकर त्याला फितले. पण सिदोजींनी आपले इमान सोडले नाही. त्यांनी बहुत शर्थ करून परचक्र नष्ट केले. तेव्हा इब्राहिम शहाने संतुष्ट होऊन त्यास दरमहा तीनशे होनांची तैनात चालू केली. सिदोजी माने याचे नरसिंहपंत केसकर म्हणून एक साह्यकर्ते होते. त्यांना विजापूर दरबाराने 'विश्वासराव' असा किताब दिला होता. पुढे विजापूरची स्थिती खालावली. त्या वेळी मुस्लिम सरदार हिंदू सरदारांचा द्वेष करू लागले. त्या वेळी अनेक मराठे सरदार औरंगजेबास जाऊन मिळाले. माने कुळातील रघाजी माने हेही त्यात होते. जयसिंग दक्षिणेत शिवाजी महाराजांवर चालून आला. त्या वेळी रघाजी माने यांनी बादशाही सैन्यात विशेष पराक्रम केला. तेव्हा औरंगजेबाने मेहेरबान होऊन त्यास म्हसवड, दहीगाव, कासेगाव, सांगोली, आटपाडी इ. गावांचे देशमुखी वतन दिले. रधाजी माने वारल्यानंतर, नागोजी माने यांनी शिपाईगिरी करून, औरंगजेबाकडून राजा हा किताब मिळविला.

उत्तरकालीन यादव
 जाधव आणि भोसले या दोन घराण्यांतील कर्त्या पुरुषांची माहिती देऊन सरदार घराण्यांचा हा विचार संपवू. देवगिरीच्या यादवांनाच पुढे जाधव म्हणू लागले. यादवांचा शेवटचा राजा शंकरदेव याचा मुलगा गोविंददेव हा, हसनगंगू दक्षिणेत आला तेव्हा, चांगला प्रौढ झाला होता. महंमद तबलखाच्या क्रूर, जुलमी कारभारा-