साली बहामनी सेनापती मलिक उत् तुजार याने कोकणावर स्वारी करून राजे शिरके यांस जिंकले, आणि तू मुसलमान झालास तर जीवदान मिळेल नाहीतर तुझा शिरच्छेद करीन, अशी धमकी त्यांना दिली. राजे शिरके यांनी वरवर धर्मांतरास मान्यता दिल्याची बतावणी करून आतून खेळण्याचा सरदार शंकरराय यास साह्यार्थ पाचारण केले. आणि मग दोघांनी मिळून मुस्लिम सेनेचा त्या डोंगरी मुलुखात निःपात केला आणि कोकणचे स्वातंत्र्य अबाधित राखले. पण १४६९ साली महंमद गवान कोकण जिंकण्यात यशस्वी झाला. त्या वेळी कर्णसिंह याने बहामनी सुलतानाच्या सेवेत रणांगणी देह ठेविला. पण त्याचा मुलगा भीमसिंह याने घोरपडीच्या साह्याने खेळणा किल्ला सुलतानासाठी जिंकला. यामुळे संतुष्ट होऊन सुलतानाने भीमसिंहास 'घोरपडे' हा किताब व मुधोळजवळ ८४ गावांची जगीर नेमून दिली आणि भोसल्यांची ही शाखा मुधोळ घोरपडे म्हणून तेव्हापासून प्रसिद्ध झाली.
आकांक्षा नाही
कोकणातले हे सरदार - संगमेश्वरचे शिरके व खेळण्याचे शंकरराय फार पराक्रमी व प्रबळ होते. त्यांची स्वतःची १३० जहाजे असून अरबी समुद्रात त्यांचे फार वर्चस्व होते. त्या समुद्रावरचे व्यापारी व मक्केचे यात्रेकरू यांना ते निःशंक लुटीत असत. १४३६ साली दिलावरखान या बहामनी सरदाराने रायरी व सोनखेड हे किल्ले जिंकून सोनखेडची राजकन्या सुलतानासाठी नेली होती. पण यामुळे शिरके यांची सत्ता भंगली नाही. १४५३ साली तर त्यांनीच बहामनी सैन्याला धूळ चारली. अशा रीतीने बहामनी सत्ता स्थापन झाल्यावर, शंभर सवाशे वर्षे कोकणात शिरके यांची सत्ता अबाधित राहिली होती. तरी मराठ्यांची संघटना करून अखिल महाराष्ट्र मुक्त करण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही. बहामनी सुलतानांच्या मनात सत्तारूढ झाल्या दिवसापासून राज्यविस्तार करण्याची अदम्य आकांक्षा असे. सर्व महाराष्ट्र जिंकूनही ते स्वस्थ बसले नाहीत. वरंगळ त्यांनी बुडविले आणि विजयनगरच्या साम्राज्यवरही ते अखंड आक्रमण करीत राहिले. कर्नाटकात घुसून, तेथली सत्ता नष्ट करून, रामेश्वरपर्यंत इस्लामसत्ता पोचविण्याची ईर्ष्या त्यांना असे आणि १५६५ साली विजयनगरचा पराभव झाल्यानंतर त्यांनी ती काही अंशी पूर्ण केलीही. त्यासाठी आपसांतील वैरे विसरून निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही या एक झाल्या होत्या. दिल्लीचे मोगलही त्यांच्या पाठीशी होते. पण कोकणच्या प्रबळ मराठा सरदारांच्या चित्तात मात्र महाराष्ट्र जिंकण्याची व स्वराज्य स्थापण्याची आकांक्षा उदित झाली नाही. मोरे, निंबाळकर, मोहिते, सावंत है सरदार संघटित झाले असते तर त्यांना मुस्लिम सत्ता भारी नव्हती. पण तसा प्रयत्न १६५० पर्यंत कधी झालाच नाही. असे का व्हावे ?
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२९६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७१
मराठा सरदार