Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२६४
 

मुसलमान झाल्यावर सहज करू शकतो. या घटिताचा विचार हिंदुधर्मीयांनी, भारतीय संस्कृतीच्या अभिमान्यांनी व अभ्यासकांनी अवश्य केला पाहिजे. कोणीही उपरी माणूस महाराष्ट्रात येतो व राज्य स्थापन करतो, कोणीही बाटगा मनुष्य स्वतंत्र शाही निर्माण करतो. आणि येथे शतकानुशतक वंशत्व मिरवणारे वसिष्ठ वामदेवांचे, याज्ञवल्क्य-पराशरांचे गोत्र सांगणारे ब्राह्मण व रामकृष्ण, सूर्यचंद्र, अग्नी यांचा वारसा सांगणारे मराठे, देवळे, मूर्ती, स्त्रिया, स्वधर्म व स्वसंस्कृती यांची विटंबना पहात स्वस्थ बसतात. नव्हे त्या विटंबना करणाराच्या चाकरीत भूषण मानतात. याचा अर्थ आपण नीट लावला पाहिजे. या समाजाच्या मूळ कर्तृत्वालाच कोठे तरी कीड लागली असली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. शब्दप्रामाण्य, निवृत्ती, जातिभेद, अस्पृश्यता, कर्मकांड, दैववाद, सिंधुबंदी, शुद्धिबंदी या अत्यंत अधम लक्षणांनी युक्त असा जो व्यक्तिनिष्ठ व समाजपराङ्मुख धर्म, तीच ही कीड होय हे मागल्या अनेक विवेचनांवरून ध्यानी येईल.

राज्यलक्ष्मीपासून अलिप्त
 बहामनी राज्याच्या उत्तरकाळाचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्रीयांची त्या काळची कर्तृत्वशून्यता, या समाजाच्या पराक्रमाला आलेली अवकळा जास्तच स्पष्ट होते. इ. स. १४९० च्या सुमारास बहामनी सत्तेची पाच शकले होऊन तिच्या इतिहासाचा पहिला कालखंड संपला. त्यानंतर आदिलशाही, निजामशाही इ. वर सांगितलेल्या पाच शाह्यांचे राज्य महाराष्ट्रात सुरू झाले. एका राज्याची पाच शकले झाल्यामुळे त्यांचे सामर्थ्य एकपंचमाशापेक्षाही कमी झालेले होते, हे उघडच आहे. नालायक सुलतान, अल्पवयी वारस, त्यामुळे दरबारी लोकांत पडलेले तट व त्यांतून उद्भवणारी कारस्थाने, कर्त्या वजिरांचे खून, शिया-सुनी, दक्षिणी परदेशी हे भेद ही सर्व बहामनी सत्तेला घातक झालेली कारणे या शाह्यांत होतीच. आणि शिवाय, या पाचही शाह्यांत नित्य चालू असलेल्या लढाया हे शक्तिपाताचे आणखी कारण होते. सुमारे अर्ध- शतकानंतर दिल्लीला अकबर हा उदयास आला. आणि तेव्हापासून या पाच शाह्या नेस्तनाबूद करण्याचा विडा उचलून मोगल बादशहा सतत शंभर वर्षे त्यांच्यावर स्वाऱ्या करीत होते. त्यामुळे त्यांच्या सामर्थ्याची आणखी पोखरण होत होती तरीही सुमारे दीडशे वर्षांच्या अवधीत मराठ्यांना यांतली एकही शाही बुडविता आली नाही ! यांतील शाह्या बुडाल्याच नाहीत असे नाही. पण ते कार्य इतर मुस्लीम सत्तांनी केले. मराठ्यांचा त्यात कोठेच संबंध नव्हता. इ. स. १५२९ साली विजापूरच्या आदिलशहाने बेदरची बेरीदशाही जवळजवळ बुडविली, तरी पुढे १००-१२५ वर्षे ती जीव धरून होती. १६५६ साली ती औरंगजेबाने पूर्ण नष्ट केली. १५७२ साली वऱ्हाडची इमादशाही अहमदनगरच्या निजामशहाने खालसा केली. नंतर १६०० साली मोगलांनी ती निजामशाही बव्हंशी आणि १६३७ साली निखालस बुडवून टाकली. तेव्हा या