Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५७
बहामनी काल
 


शिया व सुनी
 दक्षिणी व परदेशी या वांशिक भेदाप्रमाणेच सुनी व शिया हा धार्मिक भेदही बहामनी सत्ता विकल करण्यास कारणीभूत झाला होता. बहुतेक सर्व दक्षिणी हे सुनी असून परदेशी हे शियापंथी होते. त्यामुळे त्यांच्या वैमनस्याला धर्मद्वेषाची धार दर वेळी येत असे. पण हा धर्मद्वेष याहीपेक्षा जास्त अनर्थाला कारण झाला; कारण बहामनी सुलतान कधी शियापंथ स्वीकारीत तर कधी सुनी पंथ. त्यामुळे शिया सुलतानाच्या जागी सुनी सुलतान आला की सर्व सत्ताधारी मंडळच पदभ्रष्ट होई व नवीन येणाऱ्या सुनी सरदारांविषयी आकस धरी. हसन गंगू जाफरखान हा शिया होता तर त्याचा मुलगा महंमद हा सुनी होता. सुलतान फिरोज हा सुनी होता तर त्याच्या मागून आलेला अहंमद शहावली हा शिया होता. अबिसिनियातून आलेले हबशी लोक हे वास्तविक परदेशी. पण ते सुनी होते. शिवाय ते अतिशय कुरूप असल्यामुळे अरब, इराणी, तुर्क हे परदेशी त्यांना तुच्छ लेखीत. त्यामुळे सर्व हबशी नेहमी दक्षिणी पक्षात असत. या धर्मपंथाविषयी लिहिताना सर वूलसेले हेग म्हणतात, 'साधारणतः परदेशी हे शिया व दक्षिणी हे सुनी असत. पक्ष व पंथ यांची अगदी काटेकोर समव्याप्ती होती असे नाही. स्वार्थ, भीती, यामुळे या पक्षाचे त्या पक्षात किंवा पंथात जात हे खरे. पण बव्हंशी विभागणी तशी होती. त्यामुळे निर्माण झालेला पक्षद्वेष हाच नित्य प्रबळ असे. स्वार्थातीत अशी राष्ट्रीय दृष्टी कोणत्याही पक्षात किंवा पंथात केव्हाच निर्माण झाली नाही.' (केंब्रिज हिस्टरी, खंड ३ रा, पृ. ४०४)

हिंदू काफरांचा उच्छेद !
 अशा या इस्लामी राज्यात हिंदू प्रजेची स्थिती काय असेल याची कल्पना करणे अवघड नाही. सर वूलसेले हेग म्हणतात, 'बहामनी सुलतानांचे समकालीन व समधर्मी जे दिल्लीचे सुलतान त्यांच्या प्रजेसारखीच, किंबहुना थोडी अधिकच, हलाखीची स्थिती बहामनी प्रजेची होती. हिंदू शेतकऱ्यांच्या हिताकडे मुळीच लक्ष दिले जात नसे. त्या वेळच्या भारतात आलेला रशियन प्रवासी निकितिन म्हणतो, 'सरदार लोक सर्व गबर झालेले असून या भूमीचे पुत्र हे दुःख व दारिद्र्यात पिचले होते. १३८७ पासून बारा वर्षे महाराष्ट्रात अत्यंत भीषण दुष्काळ पडला होता. त्या वेळी सुलतान महंमद याने एक हजार बैलांचा तांडा ठेवून गुजराथ व माळवा येथून धान्य आणविण्याची व्यवस्था केली होती. ते धान्य स्वस्त दराने विकले जाई. पण ते फक्त मुसलमानांना. हिंदूंना नव्हे.' (केंब्रिज हिस्टरी, खंड ३ रा, पृ. ४८५.) हा सुलतान महंमद मोठा विद्वान व सुसंस्कृत व प्रजाहितदक्ष असा होता, असे इतिहासकार म्हणतात. त्याल दक्षिणचा ॲरिस्टॉटल असे म्हणत असत (ॲरिस्टॉटल या अभिधानाचा अर्थ कळण्याचीही पात्रता येथे नव्हती इतकाच याचा अर्थ). अशा सुलतानाच्या राज्यात हिंदू १७