Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२५४
 


बहामनी सुलतान
 बहामनी सुलतानांपैकी पहिला सुलतान जाफरखान ऊर्फ अल्लाउद्दिनशहा, (१३४७-५८), त्याचा मुलगा महंमदशहा (१३५८- ७५) फिरोजशहा, (१३९७- १४२२ ), अहंमदशहा वली (१४२२ - १४३५) व अल्लाउद्दिनशहा (१४३५-५७) एवढेच काय ते पराक्रमी व कर्तबगार असे होते. एकंदर अठरा मुलतानांपैकी बाकीचे बहुतेक नादान, व्यसनी व नालायक असेच होते. केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया या ग्रंथात सर वूलसे हेग हे म्हणतात, 'दारू हा या वंशाला शापच होता. अठरा सुलतानांपैकी बहुतेक सर्व कट्टे दारुडे होते. त्यामुळे चहाडखोर, तोंडपुजे, आपमतलबी यांचाच दरबारात भरणा असे. आणि त्यांच्या सांगण्यावरून हे सुलतान वाटेल ती अनन्वित व क्रूर कृत्ये करीत' (खंड ३ रा, पृ. ४३२ ). गो. स. सरदेसाई यांनी असाच अभिप्राय दिला आहे. ते म्हणतात, 'महंमदशहानंतर (१३७५ नंतर) झालेल्या राज्यकर्त्यांचे महत्त्व ऐतिहासिक दृष्ट्या पाहिले असता विशेष नाही. त्यांच्या कारकीर्दीत हिंदू व मुसलमान यांमध्ये (विजयनगर व बहामनी) एकसारखे युद्धप्रसंग चालू होते. शिया व सुनी किंवा परदेशी आणि दक्षिणी या दोन पक्षांतील कलह कधी मिटले नाहीत.' (मुसलमानी रियासत, आवृत्ती इ. स. १८९८, पृ. २५३) बहुतेक सुलतान मद्यासक्त व नादान आणि त्याच्या भरीला दर वेळी होणारे वारशाचे कलह. अशा स्थितीत राजसत्ता किती दृढ असू शकेल याची सहज कल्पना येईल. महंमदशहाचा मुलगा मुजाहिदशहा (१३७५ - ७८) यास त्याचा चुलता दाऊदखान याने ठार मारिले. पुढे दोन महिन्यांत त्याचाही खून झाला व महंमूदशहा गादीवर आला. याला दोन मुलगे होते. पण दरबारी कारस्थानात ते बळी पडले व दाऊदखानाचा मुलगा फिरोजशहा गादीवर आला. त्याच्या भावाने याच्या विरुद्ध बंड केले. तेव्हा त्याचे डोळे काढण्याचा शहाने विचार केला. पण लढाईत त्याचाच पराभव झाला व तो भाऊ अहंमदशहा वली हा किताब घेऊन तख्तावर बसला. १४५७ मध्ये हुमायूनशहा जालीम हा सुलतान झाला. तेव्हा याचा भाऊ हसनखान याने बंड केले. त्या वेळी शहाने त्याला पकडून अत्यंत क्रूरपणे त्याचा वध केला व त्याच्या सात हजार शिपायांना कल्पनातीत हाल करून ठार मारले. या शहाच्या भेटीस जाताना सरदार लोक बायका पोरांचा निरोप घेऊनच जात असत.

झोटिंगशाही
 वारसांच्या प्रमाणेच सरदार लोकांत सरदारी व वजिरी यांसाठी कायमचे कलह चालत. जनानखान्यातील स्त्रिया कारस्थाने करून कलह पेटवीत ते वेगळेच. हुमायूनशहाचे दोन सरदार निजाम उलमुल्क घुरी व ख्वाजाखान यांनी देऊरकोंड्यास वेढा घातला होता. पण त्यांचा पराभव होऊन त्यांना पळ काढावा लागला. या वेळी