तर ही वार्ता महिनाभर आधी कळण्यास काहीच हरकत नव्हती. देवगिरीवर धाड चालण्यापूर्वी दोन दिवस अल्लाउद्दिन एलिचपूरला थांबला होता. तेथील सुभेदार कान्हा याने त्याचा प्रतिकारही केला. या वेळी जरी रामदेवाला वार्ता मिळाली असती तरी देवगिरी किल्ला पडला नसता. पण किल्ल्यावरून मुस्लिम लष्करातील घोड्यांच्या टापांची धूळ दिसू लागली तेव्हा राजाला कळले की कोणीतरी ( ! ) स्वारी करून येत आहे. त्याने या आधीच आपला पुत्र शंकरदेव यांच्याबरोवर यादवसेना दक्षिण- सरहद्दीकडे धाडून दिल्या होत्या. अल्लाउद्दिनाला ही बातमी बरोबर होती. म्हणूनच त्या नेमक्या वेळी त्याने हल्ला केला. पण हल्ला येणार ही बातमी रामदेवरावाला मात्र नव्हती !
कर्तृत्वशून्यता
यादवांच्या पराभवाची वार्ता अशीच खेदजनक, उद्वेगजनक आहे. रामदेवरावाचा पराभव झाला, त्याने शरणागती पत्करली. तेवढ्यात शंकरदेव परत आला. अजूनही सर्व डाव सावरता आला असता. कारण अल्लाउद्दिनाची फोज सारी तीनचार हजार होती. शंकरदेवाला तिचा निःपात करणे मुळीच अवघड नव्हते. पण अल्लाउद्दिनाने आधीच भूमका उठवून ठेविली होती की मी पुढे आलो आहे, मागून दिल्लीहून २०००० लष्कर येत आहे. शंकरदेवाने त्याच्या सैन्यावर हल्ला केला तेव्हा मुस्लिम कच खाऊ लागले होते. पण तेवढ्यात नुसरतखान याच्या हाताखाली अल्लाउद्दिनाने देवगिरीच्या किल्ल्यापाशी ठेविलेली एक लहानशी टोळी त्यांच्या मदतीला आली. यादव सेनेला वाटले, हेच ते सुलतानाचे लष्कर आणि मग तिचा धीर खचला. मग तिची धुळधाण होण्यास किती उशीर ? म्हणजे एका खोट्या कंडीमुळे, एका थापेमुळे यादवाचे, महाराष्ट्राचे, दक्षिणेचे आणि भारताचे भवितव्य बदलले! दिसावयास असे दिसते खरे, पण ते खरे नाही. थापेवर विश्वास ठेवणारे, बेसावध, नादान राज्यकर्ते येथे होते, राज्य संभाळण्यास अवश्य ते सामर्थ्य, ती राजनीती, ती सावधानता, चतुरस्रता, आक्रमणशीलता, ते क्षात्रतेज यांपैकी कसलाही गुण त्यांच्या ठायी नव्हता, म्हणून भारताचे भवितव्य फिरले हे सत्य आहे.
तसे नसते तर या पहिल्या लढाईतला पराभव निर्णायक ठरला नसता. आणि इतिहासाने तो योगायोग मानला असता. पण मलिक काफूरच्या पुढच्या स्वारीच्या वेळी हेच झाले. ती १३०७ साली आली. म्हणजे मध्यंतरी तयारीला ११ वर्षे मिळाली होती. यादवांचे क्षात्रतेज जिवंत असते, त्यांचे प्रधानमंडळ कार्यक्षम असते, त्यांचे सेनापती रणनिपुण असते तर तेवढ्या अवधीत त्यांना दिल्लीवर चालून जाऊन सुलतानीचा निःपात करण्याइतकी तयारी करता आली असती. पण ही ऐपतच आता हिंदूंच्या ठायी राहिली नव्हती. म्हणून दुसऱ्याही लढाईत यादवांचा पराभव झाला आणि तेथून पुढे ते मलिक काफूरला वरंगळ, द्वारसमुद्र ही राज्ये बुडविण्यास साह्य करू लागले.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२७४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४९
बहामनी काल