Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४३
साहित्य, कला व विद्या
 

वेदान्त व कर्मकांड यांत ती कशी आली हे मागे सांगितलेच आहे. त्यामुळे बुद्धिप्रामाण्य विद्यापीठातच संपुष्टात आले आणि प्रगती खुंटली. लो. टिळकांनी म्हटलेच आहे की प्राचीन काळी आमचे शास्त्रज्ञ स्वतंत्र संशोधन करीत. पण पुढे ते मागल्या शास्त्रज्ञांचे सिद्धान्तच खलीत बसले. त्यामुळे सर्व प्रगती थांबली.

सप्तशृंखला
 हा सर्व भारताच्याच विद्यांचा इतिहास आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. शब्दप्रामाण्याच्या जोडीला पुढे निवृती आली, कर्मकांड आले आणि आमची जीव- शक्तीच क्षीण झाली. सन बाराशेच्या सुमारास मुसलमानांनी येथली होती नव्हती ती सर्व विद्यापीठे नष्ट करून टाकली, ग्रंथसंग्रह जाळून टाकले व आचार्यांना ठार मारले. यांचे रक्षण आम्हाला का करता आले नाही ? ज्या कारणांमुळे आमची राज्ये आम्हांला संभाळता आली नाहीत त्याच कारणांमुळे विद्यापीठेही रक्षिता आली नाहीत. याची कारणमीमांसा मागे अनेक ठिकाणी केली आहे. 'सप्तशृंखला' हे थोडक्यात सर्वांचे कारण म्हणून सांगता येईल. या श्रृंखला सातव्या आठव्या शतकापासून आम्ही तयार करू लागलो. आणि बाराव्या शतकापर्यंत त्या स्वतःच्या हातापायांत आम्ही पक्क्या ठोकून बसविल्या. तेव्हा सर्व प्रगती खुंटेल नाही तर काय होईल ?
 सातवाहन ते यादव या कालखंडातील साहित्य, कला व विद्या यांचा इतिहास आपण पाहिला. त्यातील कलेचा इतिहास हा अमर व विश्ववंद्य अशा कलाकृतींनी भरलेला आहे. साहित्य व विद्या यांविषयी असे म्हणता येत नाही. विद्याध्ययन येथे होत असे. पण तक्षशिला, नालंदा अशी विद्यापीठे महाराष्ट्रात झाली नाहीत आणि ऐहिक शास्त्रांच्या अध्यापनाची सोय येथील विद्याकेंद्रात मुळीच नव्हती. साहित्यातही अमर विश्ववंद्य अशा कृती नाहीत, विद्या व साहित्य यांतील या उणिवा मनाला जाणवतात. कलावैभवाने मात्र महाराष्ट्राला अमर कीर्ती मिळवून दिली आहे.