Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३९
साहित्य, कला व विद्या
 

आपल्या गायनाने प्रसन्न करून घेतल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात, त्यावरून हे स्पष्ट आहे. तेव्हा कोरीवकला, मूर्तिकला, स्थापत्य, चित्र आणि नृत्य व संगीत या कला सातवाहन ते यादव या कालात वैभवाला पोचल्या होत्या हे निर्विवाद आहे. (यादव कालाअखेरच्या संगीताचा विचार पुढील कालखंडातील एका लेखात केला आहे. )

विद्या
 
-व्याप
 सातवाहन - यादव या कालखंडातील साहित्य व कला यांचा विचार झाला. आता या कालातील विद्यांचा विचार करावयाचा. विद्या हा शब्द फार व्यापक अर्थाने येथे वापरला आहे. प्राचीन काळी भारतात तक्षशिला, नालंदा, वल्लभी, कांची, मदुरा अशी अनेक विद्यापीठे होती. त्यांमध्ये पारलौकिक व ऐहिक अशा दोन्ही विद्यांचा अभ्यास होत असे. वेद, उपनिषदे, षड्दर्शने, त्रिपिटक, जातक ग्रंथ हे बौद्ध ग्रंथ, जैनांचे ग्रंथ, या तिन्ही धर्माची मूलतत्त्वे, त्यांतील शैव, वैष्णव, हीनयान, महायान, श्वेतांवर, दिगंबर इ. पंथ या सर्वांचा अभ्यास तेथे होई. पण त्याबरोबरच वास्तुकला, स्थापत्यशास्त्र, वैद्यकशास्त्र, कृषिशास्त्र, चित्रकला, शिल्पकला, गणित, ज्योतिष, युद्धविद्या, अश्वपरीक्षा, गजपरीक्षा, रत्नपरीक्षा, रसायन, खाणींचे शास्त्र, पणकर्म (व्यापार विद्या), पाषाणकर्म, ( पाथरवटाची कला ), चर्मकर्म, धातुकर्म यांचाही अभ्यास होत असे. आणि या विद्यापीठांची व तेथील आचार्याची इतकी कीर्ती होती की भारतातल्या सर्व प्रांतांतून, इतकेच नव्हे, तर चीन, इजिप्त, अरबस्थान या परदेशांतूनही येथे विद्यार्थी येत असत.
 अशा व्यापक अर्थाने वरील काळच्या महाराष्ट्रातील विद्यांचा विचार करू लागताच, प्रथमच एक गोष्ट मनाला खटकते. ती ही की महाराष्ट्रात एवढ्या दीर्घ कालखंडात तक्षशिला, नालंदा, वल्लभी यांसारखे एकही विद्यापीठ नव्हते. येथे पैठण, नाशिक, कऱ्हाड ही विद्याकेंद्रे होती. आणि निरनिराळ्या विद्यांचा अभ्यासही येथे होत असे. पण वरीलसारखे एकही विद्यापीठ येथे नसावे ही उणीव मनाला जाणवल्यावाचून राहात नाही.
 सातवाहन ते यादव या कालखंडात पाचसहा राजवंश होऊन गेले. यांपैकी प्रत्येक राजवंशाच्या काळातील विद्याध्ययनाची तपशीलवार माहिती मिळत नाही. राष्ट्रकूट व यादव यांच्या काळची जरा सविस्तर मिळते. ती येथे देतो. इत्सिंग, ह्युएनत्संग यांची प्रवासवर्णने व इतरत्र येणारी त्रोटक वर्णने यांवरून असे दिसते की साधारणपणे शिक्षणाचे हेच स्वरूप या कालखंडाच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र होते.