Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३१
साहित्य, कला व विद्या
 

ग्रंथकार सांगितले त्यांत एकही ब्राह्मणेतर नाही. मग क्रांती झाली ती कोठे ? महानुभावपंथ अवैदिक आहे, तो वेद मानीत नाही आणि चातुर्वर्ण्य मानीत नाही. यात अर्वाचीन पंडितांना क्रांती दिसते. पण ती आजच्या महानुभावांनाच मान्य नाही. १९३७ साली नागपूरच्या न्यायालयात सनातन पंडितांनी महानुभावांवर खटला केला होता. त्या वेळी बाळकृष्ण महानुभावांसारख्या पंडितांनी अनेक पुरावे देऊन आणि अर्वाचीन पंडितांचेच आधार देऊन, हा पंथ पूर्णपणे वेदानुयायी आहे व त्याने रोटी-बेटीबंदी मोडल्याचे एकही उदाहरण नाही, असे सिद्ध केले. न्यायमूर्ती पुराणिक यांनी आपल्या निकालपत्रात स्वच्छ म्हटले आहे की 'हा पंथ वेदानुयायी आहे यात कसलाही संदेह नाही.'
 वचनप्रामाण्य, कलियुग, कर्मवाद, विषमता या सर्व बाबतीत असेच आहे. या पंथाने कसलीही क्रान्ती केलेली नाही. जेवावे कसे, वस्त्र कसे नेसावे इतक्या क्षुद्र गोष्टीतही चक्रधरांच्या आज्ञा काटेकोर पाळल्या पाहिजेत, नाही तर विधिभंग होतो, असा दण्डक होता. इतके वचनप्रामाण्य असताना क्रान्ती कशी होणार ? कलियुग- कल्पनेत मनुष्य कालवश आहे, स्वतंत्र नाही, असा अर्थ आहे. तो महानुभावांना सर्वस्वी मान्य आहे. 'कलियुगाचे अंती कव्हणी धर्माधर्म न वर्तेती, वर्णावर्ण लोपती, पापरता प्रजा होती, स्त्रियांच्या ठायी पतिव्रता धर्मु न वर्ते,' असे चक्रधरस्वामी सांगतात. चातुर्वण्य, जातिभेद यांविषयी वर सांगितलेच आहे. काही महानुभाव थोर पुरुष हीन जातीयांबरोबर जेवले, राहिले हे खरे. पण त्याने काय होणार ! वर्ण, जाति- विषमता समाजातून नष्ट करण्यासाठी त्यांनी काय केले, असा प्रश्न आहे. तसे काही केले नाही व तसे आमचे तत्त्वज्ञानही नाही, असे आजचे महानुभाव सांगतात. तेव्हा महानुभावांनी समाजक्रान्ती केली हा डॉ. कोलते, डॉ. अ. ना. देशपांडे यांचा दावा फोल आहे. (त्यांच्याच पुस्तकांतून वरील अवतरणे व माहिती दिली आहे.)
 असो. महानुभाव पंथाचे साहित्य व त्यांचे तत्त्वज्ञान यांची माहिती येथवर दिली. त्यांच्या विषयी अनेक मतमतांतरे आहेत. पण त्यांनी आपले ग्रंथ गुप्त करून टाकल्यामुळे महाराष्ट्रीयांवर त्यांचा कसलाही प्रभाव पडला नाही हे सत्य आहे. तरीही मराठीत इतके वाङ्मय त्यांनी निर्माण करून ठेविले याबद्दल महाराष्ट्र त्यांचा ऋणी आहे, यात वाद नाही.
 सातवाहन ते यादव या कालखंडातील साहित्याचा येथवर विचार केला. आता या कालातील वास्तू, शिल्प, चित्र, नृत्य, गायनवादन इ. कलांचा विचार करावयाचा.

( २ ) कला
 

- जगन्मान्य
 साहित्याच्या बाबतीत अखिल भारताने किंवा जगाने महाभारत, रामायण,