Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२९
साहित्य, कला व विद्या
 


निवृत्ती
 महानुभाव पंथ हा पूर्ण निवृत्तिवादी होता. संसारात राहून मोक्षप्राप्ती होणे अशक्य आहे, असा त्यांचा सिद्धान्त होता. चक्रधराच्या सिद्धान्तसूत्रपाठातील काही वचने पाहा 'स्वदेशसंबंधु त्याज्यु, स्वग्रामसंबंधु त्याज्यु, संबंधीयांचा संबंधु तो विशेषता त्याज्यु' असा स्वामींचा उपदेश आहे. इतर निवृत्तिवादी पंथ फक्त संसार सोडावा असे सांगतात. पण चक्रधरांनी स्वग्राम, स्वदेश सर्वांचाच त्याग केला पाहिजे, असे सांगितले आहे. स्त्रीची अनन्वित निंदा हा निवृत्तीचाच एक भाग मानला जातो. चक्रधर म्हणतात, 'स्त्री म्हणजे मत्त द्रव्यांचा राओ गा । आणिक द्रव्ये सेविलिया माजविती, स्त्री दर्शनमात्रेच माजवी, चित्रीची ही स्त्री न देखावी'. भास्कराचार्याने एकादशस्कंधात स्त्रीविषयी असेच वर्णन केले आहे. 'स्त्री हे पापाची उत्तरपेठ, नरकाची राजवट, मुक्तीचे वज्रकपाट, कामिनी हे।' असे तो म्हणतो.
 साधकाची राहाणी अत्यंत घाणेरडी व किळसवाणी असावी, असे महानुभाव तत्त्वज्ञान सांगते. साधकाचा देह अस्थिपंजरासारखा असावा, अंगातली हाडे वाजतील असा असावा. त्याची वस्त्रे अत्यंत घाणेरडी असावी, शक्य तर स्मशानातली प्रेताची वस्त्रे नेसावी, त्याने सदैव प्रेतासारखे किंवा पोळलेल्या कुत्र्यासारखे राहावे, आणि अशा स्थितीत सदैव परमेश्वराचे चिंतन करावे. आपल्या पंथातील माणूस भेटला तर त्याच्याशीच फक्त बोलावे. इतर कोणाशी एक शब्दही कधी बोलू नये.

विचित्र तत्त्व
 पण यापेक्षाही महानुभाव पंथात एक विचित्र तत्त्व आहे. ते म्हणजे महानुभावाने कधी कोणाच्या उपयोगी पडू नये, हे होय. चक्रधर सांगतात, 'मसणीचे लाकूड, तेही वरी उपयोगा जाए । परी आपण कवणाचेही उपयोगा न वचावे.' याच्याही पुढे जाऊन चक्रधर म्हणतात की जिवंतपणी तर नाहीच, पण मेल्यावरही आपण कोणाच्या उपयोगी पडणार नाही याची काळजी घ्यावी. इतकी समाजविमुखता महानुभावांच्या निवृत्तीत आहे. याला कारण हे की 'दया, करुणा एके परमेश्वरीच आती' - फक्त परमेश्वराजवळच दया, करुणा हे भाव असतात, ते माणसाच्या ठायी असणे योग्य नाही, असे त्यांचे मत आहे.
 महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर महानुभावांचे फार प्रेम होते. केशवराजसूरीने एकदा चक्रधरांचा पट्टशिष्य नागदेवाचार्य यास विचारले की 'उद्धरण', 'संस्करण' ही प्रकरणे संस्कृतात लिहू काय ? त्यावर नागदेवाचार्य म्हणाला, 'नको गा, केशव देया. येणे माझे स्वामीचा सामान्य परिवारू नागवैल की. परमेश्वरे (चक्रधरांनी) सकळासी ब्रह्मविद्येचा लाभु द्यावा म्हणौनिचि महाराष्ट्रिये - मराठीत-निरोपिले गा. एरवी सर्वज्ञा (चक्रधरांना) काई देववाणी निरोपू न लाहे की गा ! म्हणौनि केशवा, संस्कृत